बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेच्या धक्कादायक निधनानंतर चाहत्यांसह कलाविश्वालाही मोठा धक्का बसला आहे. ३२व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. कर्करोगामुळे पूनमचं निधन झालं असल्याचं बोललं जात आहे. तिच्या निधनानंतर चाहत्यांसह कलाकार मंडळीही सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. तिच्या इन्स्टाग्रामद्वारे पोस्ट शेअर करत निधनाची बातमी सांगण्यात आली. पण पूनमच्या निधनापूर्वी नेमकं काय काय घडलं? हे आता समोर आलं आहे. शिवाय तिचे कार्यक्रमादरम्यानचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गुरुवारी (१ फेब्रुवारी) पूनमचं निधन झालं असल्याचं पूनमच्या मॅनेजर टीमने ‘न्यूज १८’शी बोलताना सांगितलं. मॅनेजर टीमनेच इन्स्टाग्राम पोस्टद्वारे निधनाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली, कर्करोगामुळे पूनमचं निधन झालं असल्याचंही सांगण्यात आलं. पण त्याचपूर्वी तिने विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. त्यादरम्यानचाच तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती शारीरिक दृष्ट्याही अधिक फिट दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच पूनमला कर्करोग झाला होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आणखी वाचा – पूनम पांडेच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं?, युपीमधील राहत्या घरी गेली अन्…; शेवटच्या पोस्टमुळे खळबळ
शिवाय या कार्यक्रमादरम्यान तिने मुन्नवर फारुकीबाबतही भाष्य केलं होतं. पूनमने म्हटलं होतं की, “पहिल्या दिवसापासून मी मुन्नवरला पाठिंबा दिला आहे. मला कुठे ना कुठे हे माहित होतं की, मुन्नवरच जिंकणार आहे. मी त्याच्याबरोबर ‘लॉकअप’मध्ये तीन महिने राहिले आहे. मला त्याचं डोकं कसं आहे ते माहित आहे. मी तेव्हाही बोलले होते आणि आजही सांगते की, मला आनंद आहे की, तो जिंकला आहे. माझ्या भावाला खूप साऱ्या शुभेच्छा”.
मुन्नवरने ‘बिग बॉस १७’चं विजेतेपद मिळावल्यानंतर त्याचाबाबत पूनम भरभरुन बोलली होती. पूनमचा शेवटपर्यंत असलेला लूक पाहून तिला कर्करोग झाला नसल्याचंही अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. आता पूनमबरोबर नेमकं काय घडलं? तिचं निधन नेमकं कधी झालं? याबाबत तिच्या कुटुंबियांनी बोलणं टाळलं आहे.