Poonam Pandey Died at 32 : बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेच्या निधनाची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. तिच्या निधनानंतर चाहते सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करत आहेत. वयाच्या ३२व्या वर्षी पूनमने जगाचा निरोप घेतला. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी तिने लढा दिला. मात्र यापूर्वी तिने कधीच तिच्या आजाराबाबत खुलेपणाने भाष्य केलं नाही. तसेच पूनमने तिच्या आजाराचं गुपितच ठेवलं. अचानक पूनमच्या निधनाची बातमी ऐकताच चाहत्यांसह कलाविश्वाला मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवाय तिचं खासगी आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिलं. लग्नानंतर पतीसह तिचा वाद निर्माण झाला.
पूनम तिच्या बोल्ड लूकमुळे सतत चर्चेत राहिली. पण त्याचबरोबरीने तिचं वैवाहिक आयुष्य अधिका वादग्रस्त ठरलं. १ सप्टेंबर २०२०मध्ये तिने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेबरोबर लग्नगाठ बांधली. करोनाकाळात तिने बॉयफ्रेंडसह गुपचूप लग्न उरकलं. मुंबईमधील राहत्या घरी अगदी जवळचे नातेवाईक व मित्र-मंडळींमध्ये तिने लग्न केलं. पण तिचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. तिने नवऱ्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली.
लग्नाच्या १० दिवसांनंतर तिने सॅमविरोधात तक्रार दाखल केली. पतीवर तिने मारहाणीसारखे गंभीर आरोप केले. त्यानंतर २३ सप्टेंबरला सॅमला गोव्यामधून अटक करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार साऊथ गोव्यामधील कॅनाकोवा गावामध्ये घडली. त्यादरम्यान गोव्यामध्ये पूनम एका चित्रपटाचं चित्रीकरण करत होती. पूनमने ‘लॉकअप’ शोमध्ये तिच्याबरोबर घडलेल्या सगळ्या घटनांबाबत भाष्य केलं होतं.
सॅम दारु पिऊन मारतो तसेच डोक्यावरही मारहाण करतो असं पूनमने म्हटलं होतं. त्यामुळे ब्रेन हॅमरेज हा आजार झाला असल्याचंही तिने यावेळी सांगितलं. जवळपास एक वर्ष रुग्णालयामध्ये पूनम भरती होती. तिच्यावर अधिक काळ उपचार सुरु होते. पूनमच्या हातावर, चेहऱ्यावर तसेच डोक्यावर जखमा झाल्या होत्या. मुंबई पोलिसांनी सॅमला अटक केल्यानंतर त्याला जामिनावर सोडवण्यातही आलं होतं. तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर पूनम पुन्हा सॅमबरोबर एकत्र राहू लागली. यादरम्यान पूनमला बरंच ट्रोलही करण्यात आलं होतं.