सध्या मनोरंजन सृष्टीत सर्वत्र लग्नाचा माहोल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री पूजा सावंत ही नुकतीच सिद्धेश चव्हाणबरोबर विवाहबंधनात अडकली. काल (२८ फेब्रुवारी) रोजी दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या शाही विवाहसोहळ्याचे काही खास क्षण पूजाने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
पूजाने तिच्या लग्नासाठी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तसेच या साडीवर तिने परिधान केलेल्या पारंपरिक दागिन्यांनी, हातातील हिरव्या चुड्याने व नाकातील नथीने तिचं सौंदर्य आणखीनंच खुलून आलं होतं. तर सिद्धार्थने लग्नासाठी खास पांढऱ्या रंगाची शेरवानी व त्यावर डिझाइनर पांढऱ्या रंगाची शाल परिधान केली होती. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तर या सगळ्यात सोशल मीडिया आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. तो म्हणजे पूजाच्या रुखवताचा.
नवरीला सासरी पाठवताना लग्नाचे दागिने, कपडे, भेटवस्तू या सर्व खरेदीबरोबरच रुखवत देण्याचीही प्रथा आहे. लग्नाच्या मंडपात एका बाजूला हे रुखवत मांडलेलं असतं. या वस्तूंमध्ये गृह सजावटीच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू, काही खाद्य पदार्थ सजवून ठेवलेले असतात. घर सजावटीच्या आणि वापरातील वस्तूंचा संग्रह म्हणजे रुखवत. रुखवत हे नवरीला माहेरच्या मंडळींकडून दिले जाते.
असंच रुखवत पूजालाही देण्यात आले असून या रुखवतामध्ये पितळेची व मातीची भांडी, गोड खाद्यपदार्थ, शोभेच्या काही वस्तू, पेंटींग्स, गुढी, बैलगाडी, डोली, सप्तपदी यासह हाताने विणलेल्या अनेक गोष्टीही पाहायला मिळत आहेत. तसेच पूजाच्या या रुखवतामध्ये पूजाच्या व नवऱ्याच्या पेटींगने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पूजा व सिद्धेशच्या लग्नाच्या फोटोसह रुखवतालादेखील चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.