कलरफूल अभिनेत्री पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकायला सज्ज झाली आहे. गेले काही दिवस अभिनेत्रीच्या घरी लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. नुकताच पूजाचा संगीत व हळदी समारंभ पार पडला. याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पूजाच्या संगीत व हळदी समारंभाच्या अनेक फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अशातच आता तिच्या लग्नापूर्वीच्या काही विधींनादेखील सुरुवात झाली आहे.
पूजा सावंतची बहीण रुचिरा सावंतने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात पूजाचा खास Bridal Look पाहायला मिळत आहे. यात पूजाने आकाशी रंगाची साडी परिधान केली असून तिच्या डोक्याला मुंडावल्यादेखील पाहायला मिळत आहेत. तसेच पूजाने या साडीवर खास ज्वेलरी, केसात गजरा व हातात हिरव्या बांगड्यांचा चुडादेखील परिधान केलं असल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकताच पूजाचा हळदी समारंभ पार पडला. यावेळी पूजा खूपच भावुक झाली असल्याचे पाहायला मिळाले. तसेच यावेळी पूजाने बहिणीसह भन्नाट डान्सही केला होता. तिच्या या डान्सचे व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. थाटामाटात साजऱ्या झालेल्या या पूजाच्या हळदी समारंभात तिचा नवऱ्याबरोबरचा रोमँटिक अंदाजही साऱ्यांच्या पसंतीस पडला. तिच्या संगीत व हळदी समारंभाचे काही खास क्षण समोर येताच तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती आणि अखेर अभिनेत्री आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

या खास व्हिडीओआधी पूजाच्या बहिणीने एका पारंपरिक विधीचा देखील फोटो शेअर केला आहे. त्यामुळे या फोटोवरुन पूजा अवघ्या काही कालावधीतच विवाहबंधनात अडकणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पूजाचे अनेक चाहते तिच्या लग्नासाठी चांगलेच उत्सुक आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पूजाने सोशल मीडियावरुन तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. पूजाने बॉयफ्रेंड सिद्धेशबरोबरचे पाठमोरे फोटो शेअर करत तिच्या या नात्याबद्दल सांगितले होते.