छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ने गेल्या १६ वर्षामध्ये प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या मालिकेमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले. असेच अनेक कलाकारांनी मालिकेला रामरामदेखील केला. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अशातच आता या मालिकेमध्ये ‘सोनू’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री झीलने महताने तब्बल १२ वर्षांनी मालिका सोडण्यामागचे खरं कारण स्पष्ट केले आहे. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. (Jheel Mehta on Taarak Mehta ka ooltah Chashma)
२०१२ मध्ये झील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेतून बाहेर पडली होती. त्यानंतर तिची उंची जास्त असल्यामुळे निर्माते असित मोदी यांनी तिला मालिकेतून काढले असल्याचे अनेक माध्यमांमधून समोर आले होते. पण यावर अभिनेत्रीने आपले मौन सोडत यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्वतः झीलने स्पष्ट केले आहे. नुकतीच ‘टेली चक्कर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये झीलने मालिका सोडण्यामागचे खरे कारण स्पष्ट केले आहे. यावेळी ती म्हणाली की, “मी त्यावेळी दहावीमध्ये होते. दहावीची परीक्षा महत्त्वाची असल्याने मालिका सोडली होती. अभ्यास करता यावा म्हणून मी मालिकाच सोडण्याचा निर्णय घेतला”, असे तिने सांगितले.
यापुढे ती असं म्हणाली की, “जेव्हापासून मी मालिकेत दिसणे बंद झाले तेव्हापासून अनेक तर्कवितर्क मांडले जाऊ लागले. लोकांना खरंच वाटले की माझी उंची जास्त असल्याने मला मालिकेच्या निर्मात्यांनी काढले होते. पण असे नसून मी माझ्या परीक्षेच्या तयारीसाठी मालिका सोडली आणि याचा मला कोणताही पश्चाताप नाही”.
झीलने मालिका सोडल्यानंतर त्यामध्ये अनेक कलाकारांनी काम केले. अनेकदा ही मालिका वादाच्या भोवऱ्यातदेखील सापडली आहे. ‘तारक मेहता का उलट चश्मा’ या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. लहानगी सोनू अर्थात झील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच तिने तिच्या बॉयफ्रेंडबरोबर साखरपुडाही केला असून तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव केला.