Viral Video : आपल्या समाजात प्राणीप्रेमी अनेक आहेत. बरेचदा प्राण्यांच्या बाजूने उभे राहत त्यांच्यासाठी ही मंडळी आसराही बनतात. कोणा व्यक्तीने त्यांना दुखावलं तर ते त्याला खडेबोलही सुनावतात. आपणच कित्येकदा रस्त्यालगत चालताना समोर आलेल्या कुत्र्यांना पाहून दचकतो. बरेचदा जवळ येताच हाडतूडही करतो. आपले हे असे वागणे त्याने आपल्याला कोणतीही इजा पोहोचवू नये म्हणून असते. बरेचदा पाळीव श्वानांना पाहून आपण घाबरतो हे त्यांच्या मालकांना आवडत नाही. अशातच सध्या पाळीव श्वानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये पिटबुल जातीचा श्वान ११ वर्षीय बालकाला चावताना दिसत आहे.
मुंबईतील चेंबूर परिसरात घडलेली ही धक्कादायक घटना आहे. १७ जुलै रोजी ११ वर्षांचा हमजा नावाच्या मुलावर या श्वानाने हल्ला केला. हमजा त्याच्या घराजवळील पार्क केलेल्या एका रिक्षात खेळत होता. तिथे ४३ वर्षीय मोहम्मद सोहेल हसन नावाचा मालक आपल्या श्वानाला (पिटबुल) घेऊन रिक्षात गेला. श्वानाला पाहून मुलगा घाबरुन रिक्षाच्या पाठी असलेल्या जागेत लपतो. पण, मोहम्मद सोहेल हसन श्वानाला मुलाच्या अंगावर सोडण्याचा आणि त्याला आक्रमक करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सदर घडलेल्या घटनेवेळी श्वानाचा मालकही तेथेच उपस्थित होता. आणि त्यानेच श्वानाला हमजावर सोडले. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हा मालक हसतानाही कैद झाला आहे.
आणखी वाचा – ‘पारू’ मालिका बंद होणार?, नव्या मालिकांच्या वेळांना प्राधान्य दिल्याने प्रेक्षक संभ्रमात, नक्की काय होणार?
व्हिडीओमध्ये, श्वानाला आणि ११ वर्षीय मुलाला घेऊन केलेली मस्करी महागात पडल्याचं दिसत आहे. श्वान त्या चिमुकल्याच्या हनुवटी आणि मानेला चावतानाही दिसला. तो मुलगा त्या श्वानाला पाहून प्रचंड घाबरला होता. आपली सुटका करून घेण्यासाठीही तो ओरडत होता. मात्र त्या श्वानाचा मालक हे सर्व मस्करीत घेत हसताना दिसला. श्वानाचा मालक फक्त त्या प्रसंगाची मजा घेत होता. काही सेकंदांनंतर चिमुकल्याच्या ओरडण्याचा आवाज येताच तो श्वान त्याच्या हनुवटीला, मानेला चावण्यासाठी उडी मारताना दिसला. श्वान चिमुकल्याचे कपडे पकडत असताना तो गाडीतून पळून जातो. त्यानंतरही तो श्वान त्या मुलाच्या मागे धावताना दिसतो आहे. अर्थातच हे दृश्य धडकी भरवणार आहे.
आणखी वाचा – अॅक्शन सीनदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा झालेला गर्भपात, ओढवलेला वाईट काळ, खुलासा करत म्हणाली, “तीन महिने…”
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चिमुकल्याने सांगितल्यानुसार, त्याच्या हनुवटीला दुखापत झाली, त्याचे कपडेही श्वानाने ओढले. त्याने मालकाला मदत करण्याची विनंती केली. पण, तो हसत राहिला. परिसरातील कोणीही चिमुकल्याला मदत करण्यासाठी पुढे आले नाही. सगळे फक्त व्हिडीओ काढत होते, असे त्याने सांगितले आहे. दिलेल्या तक्रारीवरुन शुक्रवारी पोलिसांनी श्वानमालक हसनविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही प्रचंड भडकले आहेत. अनेकांनी त्या श्वान मालकाला शिक्षा व्हावी असंही म्हटलं आहे.





