‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवालाने अवघ्या ४२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झालं. सगळं काही सुरळीत सुरु असताना शेफालीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तिचा पती पराग त्यागीची अवस्था तर न पाहण्यासारखीच झाली आहे. शेफालीचं जेव्हा निधन झालं तेव्हा प्राथमिक चौकशी म्हणून पोलिसांनी त्याला घेरलं. दरम्यान पराग अगदी अस्वस्थ होताच. सगळेच रिपोर्ट संशयास्पद नसल्याने शेफालीचं हृदयविकाराच्या झटक्यानेच निधन झालं असल्याचं स्पष्ट झालं. मात्र यादरम्यान पराग शेफालीच्या निधनाच्या दिवशीच कुत्र्याला घेऊन फिरताना दिसली. यामागे नेमकं कारण काय होतं? हे आता समोर आलं आहे. (Paras Chhabra On Parag Tyagi Viral Video)
अभिनेता पारस छाब्रा शेफाली व परागचा जवळचा मित्र आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पराग त्यांचा कुत्रा सिंबाला घेऊन का फिरत होता? हे सांगितलं. पारस म्हणाला, “शेफाली आणि पराग त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या खूप जवळ आहेत. तो त्यांच्यासाठी कुटुंबातील सदस्यच आहे. तीन सदस्य एकाच घरात राहत होते. त्यातील एक सदस्य आता निघून गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही परागची मानसिक अवस्था समजून घेणं गरजेचं आहे. त्याला त्याच्या श्वानाला आणखीनच जवळ ठेवायचं होतं. कारण अशावेळी मुक प्राणीही घाबरतात. पराग कुत्र्याला घेऊन फिरत होता हे लोकांना चुकीचं वाटलं. पण मी त्याला अगदी जवळून ओळखतो”.
“त्याला ओळखत असल्यामुळे त्याच्या मनातील गोष्ट मी समजू शकतो. त्याचबरोबरीने त्यांच्या श्वानाचं वयही आता वाढलं आहे. त्याला आता नीट दिसतही नाही. त्याच्याप्रती असणारी परागची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. कारण पाळीव प्राणी मानसिकरित्या सक्षम नसतात. काहीतरी चुकीचं घडलं आहे हे त्यांनाही समजतं. सिंबालाही माहित होतं की, शेफाली आता या जगात नाही. त्यालाही शेफालीच्या जाण्यामुळे खूप दुःख झालं होतं”.
दरम्यान शेफालीला रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं होतं. कूपर रुग्णालयात तिचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यादरम्यान पराग घरी आला होता. पोलिस चौकशी सुरु होती. तसेच फॉरेन्सिक टीमही परागच्या राहत्या घरी आली होती. यावेळी पराग त्याच्या इमारतीच्या परिसरात कुत्र्याला घेऊन फिरत होता. त्यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. परागचं हेच वागणं नेटकऱ्यांना काही पटलं नाही. मात्र आता त्याचं खरं कारण पारसच्या माध्यमातून समोर आलं आहे.





