Nilesh Sabale Sharad Upadhye controversy : गेल्या काही दिवसांपासून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामधील सूत्रसंचालक निलेश साबळे आणि प्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यामध्ये वाद झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याचसह शरद उपाध्येंनी केलेल्या प्रत्येक टीकेवर डॉ. निलेश साबळे यांनी सडेतोड उत्तर देत सोशल मिडियायवर एक व्हिडीओही शेअर केला. तो व्हिडीओ सध्या सर्वत्र फार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये साबळेंनी शरद उपाध्येंनी केलेल्या प्रत्येक आरोपांवर सविस्तरपणे बोलत स्वत:ची स्पष्ट बाजू मांडली. आणि यामुळेच यांच्या वादाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. अशातच मराठी अभिनेते किरण माने यांनी निलेश साबळे यांच्या बाजूने आपल मत व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
अभिनेते किरण माने नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. अभिनयासह ते राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहेत. बरेचदा ते न पटलेले मुद्दे सोशल मीडियामार्फत सडेतोडपणे मांडतात. आताही किरण यांनी निलेश यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “निलेश साबळे, मी तुला तुझ्या अगदी सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळापासून ओळखतोय. तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काहीही गरज नाही. तू जे मिळवलं आहेस त्यामागे अफाट कष्ट आहेत. प्रामाणिकपणा आहे. कामावरची निष्ठा आहे. ‘इतरांकडे नसलेलं ज्ञान आपल्याकडे आहे’, असं भासवून ज्यांनी आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे उद्योग केले त्यांनी केलेली टीका आपण किती आणि का मनाला लावून घ्यायची?”.
पुढे त्यांनी म्हटलं, “तुकोबाराया सांगून गेले आहेत, “सांगो जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ।। त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहो नावडती डोळां ।।”. कुणाच्या वल्गनांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं. तू तुझ्या करिअरमधल्या वेगळ्या टप्प्यावर आहेस. तू आता सुत्रसंचालक हा शिक्का पुसून अभिनेता म्हणून स्वतःची ओळख करुन देण्यासाठी सज्ज होतो आहेस. तुला मनापासून शुभेच्छा”.
शेवटी त्यांनी म्हटलं, “जीव लावून काम कर. यश तुझेच आहे. टीकाकारांना उंच कोलून टाक… आणि म्हण, “ए चल्… हवा येऊ दे. खूप शुभेच्छा मित्रा. किरण माने”, असं लिहीत डॉ. नीलेश साबळे यांची बाजू घेत व्यक्त झाले.





