Legendary Ghazal Singer Pankaj Udhas Died : प्रसिद्ध गायक व गझलकार पंकज उधास यांनी वयाच्या ७२व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संगीत क्षेत्रासह सर्वच स्तरावर हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. पंकज यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अंतिमसंस्काराबाबतची माहिती शेअर केली आहे. त्यांच्या मुलीने अंतिम संस्काराबद्दलची माहिती दिली असून मुंबईमधील वरळीतील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
पंकज यांची मुलगी नायाबने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या वडिलांच्या अंतिम संस्काराची एक भावनात्मक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, “खूप जड अंतःकरणाने आम्ही सांगतो की, पद्मश्री पंकज उधास यांचे दीर्घ आजारपणामुळे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी ३ ते ५ या वेळेत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. ठिकाण : हिंदू स्मशान भूमी, वरळी. उधास फॅमिली”.
पंकज उधास यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांच्या कर्माईकल रोड येथील असलेल्या बंगल्यावर पार्थिव आणले गेले आहे . अडीच वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. कलाक्षेत्रातील मंडळी पंकज यांच्या राहत्या घरी येण्यास सुरुवात झाली आहे. तर त्यांची मुलगीही घरी पोहोचली आहे. यादरम्यानचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर आले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार पंकज यांना रक्ताचा कर्करोग होता. काही महिन्यांनापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते उपचाराला प्रतिसादही देत होते. पण काही दिवसांनी अचानक तब्येत अधिक बिघडली आणि अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक निधनाच्या समोर आलेल्या बातमीने साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, चाहते व आप्तेष्टांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी फरीदा, दोन मुली रेवा व नायाब असे कुटुंब आहे.