‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, दिशा व दामिनी मिळून पारूच्या फोटोशूटची तयारी करतात. तर पारुला त्या बोलवून घेतात आणि तिचा अपमान करत सांगतात की, आम्ही बोलावल्यावर तू जिथे असशील तिथून पळत सुटायचं. इतका वेळ तुला यायला का लागला आणि आता तुझं फोटोशूट आहे त्यामुळे तू तयारी करायला जा. यावर पारू त्यांना विचारत म्हणते की, पण अहिल्यादेवी व आदित्य सरांनी मला याबद्दल काहीच सांगितलं नाही. तेव्हा दिशा सांगते की, ते काही रिकामी नाही आहेत तुझ्याशी चर्चा करायला. मी तुला नेहमीच आठवण करुन दिली आहे की, तू फक्त या घराची एक नोकर आहे त्यामुळे आम्ही सांगू ते तुला सर्व करावंच लागेल. (Paaru Serial Update)
यानंतर दिशा काही एग्रीमेंटचे पेपर घेऊन येते आणि सांगते की, यावर तू सही कर. आम्ही सांगितले ते काम तुला करावंच लागेल, असं म्हणून पारू कडून सही करुन घेते. त्यानंतर पारुला ती तयार व्हायला पाठवते. तर इकडे अहिल्यादेवी, आदित्य, प्रीतम, प्रिया सगळेजण ऑफिसमध्ये आलेले असतात. त्यावेळेला प्रीतम शाळेसंदर्भातील एक प्रेझेंटेशन तयार करतो आणि अहिल्या देवीसमोर प्रेझेंट करतो. हे पाहून अहिल्यादेवी खूप खुश होतात आणि सांगतात की माझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती पण तू अपेक्षा पलीकडे खूप चांगलं प्रेझेंट केलं आहेस. तू खूप सुंदर प्रेझेंटेशन दिलं आहेस आणि आता तू कामाकडे वळला आहे त्याचा खूप आनंद होतो, असं म्हणत त्याचं कौतुक करतात. त्यानंतर सगळेजण प्रीतमचं कौतुक करतात. तर अहिल्यादेवींना हे प्रेझेंटेशन आवडलेलं असतं त्यामुळे आदित्य ही प्रीतम वर खूप खुश असतो.
तर इकडे घरी दिशा विचार करत असते की, आता मी पारूचा अस फोटोशूट करेन की, तिला तोंड दाखवायला ही जागा उरणार नाही. त्यानंतर पारूसमोर तोकडे कपडे घेऊन एक मुलगी येते आणि सांगते की दिशा मॅडमने तुम्हाला हे कपडे घालायला सांगितलं आहे, यावर पारू नकार देते. पारू सांगते की मी असे कपडे घालू शकणार नाही. मला तुम्ही साडी वगैरे काही आणून द्या पण मला हे जमणार नाही. त्यानंतर दिशा स्वतः तिला समजवायला येते आणि सांगते की, हे कपडे मी नाही तर तुझ्या देवी आईने तुझ्यासाठी सिलेक्ट केले आहेत. त्यामुळे तुला जर करायचं नसेल तर तसं सांग. यावर पारू देवी आईचे नाव आल्यामुळे हे करायला तयार होते आणि कपडे बदलायला जाते. तर इकडे दिशा आणि दामिनी खूपच खुश होतात आता पारूची त्या फजिती करणार असल्याचं दिसत आहे.
मालिकेच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळत आहे की, पारू ते कपडे घालून उंच टाचांच्या चपला घालून जमत नव्हतं तरीसुद्धा फोटोशूटसाठी खाली येते. तर इकडे आदित्य विचार करतो की, पारू काही संकटात नसेल ना?, आदित्यला सुद्धा पारूचा भास होतो. आता मालिकेत पुढे काय होणार. दिशा दामिनी पारूचं फोटोशूट पूर्ण करू शकतील का? की आदित्य येऊन पारूची यातून सुटका करणार हे सार पाहणं रंजक ठरेल.