Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सुरु होऊन अवघे पंधरा दिवस झाले असून या घरातील टास्क खेळताना स्पर्धक आपण माणूस आहेत हे विसरून गेले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच कारण म्हणजे कालच्या भागात निक्कीने वर्षाताईंच्या मातृत्वावर केलेलं विधान. या घरात नुकताच छोट्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये निक्की आणि तिच्या टीमने बाजी मारली. निक्कीची टीम जिंकली असली तरीही, चुकीचं वर्तन करून तुम्ही विजयी झालात असा आरोप खेळ संपल्यावर ‘टीम बी’ कडून करण्यात आला. त्यामुळे ‘बिग बॉस’ने सर्वांना लिव्हिंग परिसरात बोलवून खेळ संपला असल्याचे जाहीर केले. (Bigg Boss Marathi Daily Update)
घरातील टास्कदरम्यान, छोट्या पाहुण्यांची नीट काळजी घेतली गेली नसल्यामुळे ‘बिग बॉस’ही सदस्यांवर नाराज झाले. हा खेळ मानवी भावभावनांचा होता मात्र त्या या खेळात कुठे दिसल्या नाहीत असं म्हणत ‘बिग बॉस’नी हा खेळ बरखास्त केल्याचे जाहीर केले. यादरम्यान आर्या बोलत असताना निक्की मानवी भावभावनांबद्दल बोलली. तेव्हा आर्याने “भावनांबद्दल कोण बोलत आहे पाहा.’ असं म्हटलं. तिचं हे वाक्य पूर्ण होण्याआधीच निक्कीने उसगांवकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या नाराजीचा सूर आहे. निक्कीने वर्षा उसगांवकरांबद्दल घरात केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या सर्वत्र नाराजी पसरली आहे. एवढंच नव्हे तर अंकितासुद्धा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
टास्क सुरू असताना निक्कीने ‘टीम बी’च्या सदस्यांच्या बाहुलीचा एक पाय तोडला. त्यामुळे वर्षा यांनी, “निक्कीने बाहुलीची मुंडी काय, तंगडं तोडलं” असं म्हटलं. यावर प्रतिउत्तर देताना निक्की म्हणाली, “यांच्या भावना बघितल्या का? आईचं प्रेम कसं समजेल जाऊदेत…” निक्कीचं हे वाक्य ऐकताच अंकिता प्रचंड भावुक झाली आणि ती रागात निक्कीला म्हणाली की, “ए… तुझं हे बोलणं अतिशय चुकीचं आहे. आताच ‘बिग बॉस’ म्हणाले… हा मानवी भावनांचा खेळ आहे आणि मॅमना तू हे असं बोलत आहेस… ते सहन होणार नाही. त्यांच्या मातृत्त्वावर जाऊ नकोस. निक्की तू चुकीचं बोलत आहेस”. अंकिता भडकल्यावर निक्की तिला म्हणते, “हे तू मला सांगू नकोस… या स्वत:च तंगडं तोडलं म्हणाल्या आणि मला भावनांबद्दल सांगतात.” निक्कीचा हा अरेरावीपणा पाहून वर्षा यांनी म्हटलं, “तू जे केलंय तेच मी सांगितलं… शब्द हे बाणासारखे असतात आणि ते परत घेता येत नाहीत एवढं लक्षात ठेव निक्की, एकदा बाण गेला की गेला”.
आणखी वाचा – Payal Malik Hospitalized : पायल मलिक रुग्णालयात दाखल, अशी झाली आहे अवस्था, नक्की आजार काय?
हे प्रकरण झाल्यानंतर काही वेळाने जान्हवी वर्षा ताई व त्यांच्या टीमशी संवाद साधताना निक्की बद्दल असं म्हणाली की, “तुमच्यासारखं आम्ही पण निक्कीला समजावू शकत नाही. तुम्हाला माहित आहे तिचा स्वभाव.” यावर पंढरीनाथ म्हणाला की, “मुलांवरून गॉसिप करणं प्रचंड चुकीचं आहे. आज इंडस्ट्रीत यांच्याबद्दल कोणी चकार शब्दही काढत नाही”. नंतर या सगळ्या प्रकरणावर निक्कीने अरबाजशी संवाद साधला. यावेळी ती त्याला म्हणाली की, “, “त्यांना मुलं नाहीत हे मला माहिती नव्हतं. धनंजय सरांनी मला याबद्दल केव्हातरी सांगितलं होतं. टास्कमध्ये त्या पण मला “इतक्या काळ्या मनाची आई नको” वगैरे असं म्हणत होत्या. तेव्हाच मला राग आला होता. आता त्या मला “बाळाच्या तंगड्या तोडल्या” असं म्हणाल्या आणि हसायला लागल्या. त्यावर मी त्यांना असं म्हणाले, एका आईचं प्रेम काय असतं तुम्हाला काय माहिती? असं माझ्या तोंडून निघालं आणि आता हा वाद मला वाढवायचा नाही”.
दुसऱ्या दिवशी निक्कीने घडल्या प्रकाराबद्दल वर्षा उसगांवकरांची माफी मागितली. यावेळी तिने “मॅम मी जे काल बोलली त्यासाठी माफी असावी. मला वाईट वाटलं, तुमच्याशी कसं बोलू मला कळत नव्हतं. पण मी धीराने तुमच्यासमोर आता आलीये आणि मी आईबद्दल जे काही बोलली त्यासाठी मनापासून सॉरी” असं म्हणत त्यांची माफी मागितली. यावर वर्षा उसगांवकरांनीदेखील “तू बोललीस ते अक्षम्य आहे पण, ठिके” असं म्हटलं. दरम्यान, या प्रकरणानंतर प्रेक्षकांमध्ये निक्कीबद्दल प्रचंड राग व वर्षाउसगांवकरांबद्दल सहानुभूती आहे. तसंच अनेकांनी याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.