प्रत्येक कलाकार हा त्याच्या आयुष्यातील कोणत्या न कोणत्या स्वप्नपूर्तीसाठी झटत असतो, अपार मेहनत करून तो ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि या काळात त्याला अनेक संघर्ष व आव्हांनाना सामोरे जावे लागते. मात्र स्वप्नपूर्ती होताच त्याच्या संघर्षापुढे आभाळही ठेंगणे होते. अशीच एक स्वप्नपूर्ती झालेला कलाकार म्हणजे लावणीकिंग आशिष पाटील. अनेक हिंदी व मराठी डान्स रिअॅलिटी शोमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून झळकलेला लोकप्रिय नृत्यकलाकार म्हणून आशिष पाटील हे नाव सर्वश्रुत आहे.
आजवर मराठीसह अनेक हिंदी रिअॅलिटी शोजमध्ये झळकलेला आशिष पाटील आता नुकताच बॉलिवूडच्या एका सुप्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबरही झळकला आहे आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साली. मराठमोळ्या आशिषने आपल्या नृत्य कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडपर्यंत मजल मारल्याने त्याचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. याबद्दल स्वत: आशिषने एक खास पोस्टही लिहिली आहे.
आशिषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे संजय लीला भन्सालीबरोबरचा एक फोटो शेअर करत त्याखाली असं म्हटलं आहे की, “कोण म्हणतं स्वप्नं खरी होत नाहीत. माझे नुकतेच खरे झाले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्याबरोबर काम करण्याचे स्वप्न मी नेहमीच पाहिले होते आणि गेल्या वर्षी त्यांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा ते स्वप्न प्रत्यक्षात आले. त्या क्षणी माझ्या हृदयात आणि मनात काय चालले होते ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी त्यांना भेटलो तेव्हा खूप भारावून गेलो होतो. ते (संजय लीला भन्साली) खूप नम्र व मितभाषी होते; पण मी उत्साहाने व आनंदाने थरथरत होतो.”
यापुढे आशिषने असं म्हटलं आहे की, “संजय लीला भन्साली यांनी त्यांच्या ‘हीरामंडी’मधील एका गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करण्यासाठी मला दिलेल्या आयुष्यभराच्या या अद्भुत संधीबद्दल मी त्यांचे खरोखर आभार मानू तेवढे कमी आहेत. सर, तुम्ही परिपूर्णता आणि नम्रतेचे प्रतीक आहात; आणि तुमच्याबरोबर काम करून तुमचे मार्गदर्शन आणि कौशल्य मला मिळाले हा माझ्यासाठी मला खरोखरच एक आशीर्वाद आहे. तुम्हांला मनापासून प्रेम आणि आदर”
दरम्यान, आशिषच्या या पोस्टखाली अनेक कलाकार मंडळींनी व अनेक चाहत्यांनी लाईक्स् व कमेंट्स करत त्याच्या या पोस्टला प्रतिसाद दिला आहे. तसेच त्याच्या या स्वप्नपूर्तीसाठी त्याला अनेकांनी शुभेच्छा व त्याचे कौतुकदेखील केले आहे.