Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, किर्लोस्कर कुटुंब पारूसह अनुष्काच्या घरी आलेले असतात. अनुष्का त्यांचा चांगलाच पाहुणचार करते. मीटिंग संपल्यानंतर अनुष्का सगळ्यांना तिचं टेरेस गार्डन दाखवायला घेऊन जाते. टेरेस गार्डन पाहायला आलेले असतानाच दामिनी पारूच्या बाजूची कुंडी मुद्दाम खाली पाडते आणि पारूवर नाव ढकलते. यावर अहिल्यादेवी सगळ्यांसमोरच पारूला ओरडू लागतात. तर दामिनी ही पारूची लायकी काढते. हे पाहून अनुष्का सगळ्यांना शांत करते आणि ती त्या कुंडीत माती भरते आणि सांगते की, गोष्टी बिघडल्या की त्या आपण नीट करायच्या असतात. त्यावर त्रागा करुन चालत नाही. हे बोलून ती सगळ्यांचे मन जिंकते.
त्यानंतर सगळेचजण घरी जायला निघतात. त्यानंतर अहिल्यादेवी सांगतात की, अनुष्का मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, असं म्हणून त्या आदित्यसाठी अनुष्काला मागणी घालतात. उद्या आदित्यचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्या वाढदिवशी तुझ्यापेक्षा मोठा सरप्राइज आणि मोठं गिफ्ट त्याच्यासाठी काहीच नसेल. त्यामुळे तू उद्या आमच्या घरी येशील तर मी तुझा होकार समजेल. हे ऐकल्यावर अनुष्का अहिल्यादेवींना म्हणते की, हा माझ्यासाठी खूप मोठा निर्णय आहे. मला विचार करायला वेळ हवा आहे. यावर अहिल्यादेवी ही अनुष्काला तू तुझा वेळ घे असं सांगतात. त्यानंतर सगळेचजण घरी निघून येतात तर रात्री आदित्य पारू आणि त्याच्या लग्नाचा व्हिडीओ पाहत बसलेला असतो त्याच वेळेला त्याला झोप लागते आणि सगळेजण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येतात. तेव्हा अहिल्यादेवी सांगतात की, उद्या तुझ्यासाठी माझ्याकडून एक खूप मोठं सरप्राइज आहे. त्यांनतर दुसरा दिवस उजाडतो.
तेव्हा पारू जास्वंदीचं फूल घेऊन आदित्यला शुभेच्छा द्यायला जाणार असते. मात्र जास्वंदीचं फुल उमलतच नाही. तेव्हा ती जास्वंदीच्या फुलाशी बोलत असते. त्यावेळेला तिचा बा तिथे येतो आणि म्हणतो की, आजकाल तू तुझ्यातच असतेस. कोणाशी बोलत असतेस, नक्की काय चालू आहे. मात्र पारू काही सांगत नाही आणि ती लाजत निघून जाते. त्यानंतर ती अहिल्यादेवींची माफी मागायला येते. कारण काल अनुष्काच्या घरी कुंडी पडलेली असते. तेव्हाही अहिल्यादेवी पारूची समजूत काढतात आणि म्हणतात की, आता अनुष्का या घराची सून होणार आहे तुला तुझी मालकिन म्हणून अनुष्का आवडेल का?, यावर पारू सुद्धा हो म्हणते आणि तिथून खाली मान घालून निघून जाते.
आणखी वाचा – Video : “गळ्यातील मंगळसूत्र…”, ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याच्या पत्नीने घेतला खास उखाणा, सुंदर व्हिडीओ व्हायरल
मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, आदित्यसाठी सरप्राइज प्लॅन केलेला असतो. तेव्हा पारूला त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याला खाली घेऊन यायला सांगितले जातं. पारू त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याला खाली घेऊन येताना सांगते की, आदित्य सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि असं म्हणून ती गळ्यातील मंगळसूत्र काढते. मात्र आदित्यच्या डोळ्याला पट्टी असल्याने तो मंगळसूत्र काही पाहू शकत नाही. आता पारू आदित्य समोर मनातलं बोलणार का हे सारं पाहणं येणाऱ्या भागात रंजक ठरेल.