Paaru Marathi Serial New Promo : ‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण यायला सुरुवात झाली आहे. मालिकेत खूप मोठे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत अनुष्का नावाचं मोठं वादळ आलं असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अनुष्काला किर्लोस्करांची सून म्हणून पसंती मिळाली आहे. आदित्य व अनुष्का यांच्या लग्नासाठी अहिल्यादेवींचा होकार असतो. तर आदित्य आई सांगेल त्या मुलीशी लग्न करेन या मतावर ठाम असतो. मात्र एकीकडे पारूचा यामुळे हिरमोड झालेला आहे. आदित्यबरोबरच्या नात्याचं गुपित पारू कोणालाचं सांगत नाही, तिला आदित्यवर कोणतंच बंधन घालायचं नाही आहे असं म्हणून ती या सर्व गोष्टी नशिबावर सोडून शांत बसते.
मालिकेत आता अनुष्का पारूचा काटा काढायला तयार असते. दिशाची बहीण अनुष्का आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेणार असते. पारूला आदित्य आवडतो ही गोष्ट अनुष्काला कळून चुकलेली असते आणि हे अनुष्काला खटकतं. किर्लोस्कर कुटुंबाला नेस्तनाभूत करण्याआधी या पारूला बाजूला करायला हवे असं अनुष्का मनाशी ठरवते. आदित्यच्या सतत मागे पुढे असणाऱ्या पारूचा ती रागराग करते. इतकंच नाही तर पारूबाबतीत आदित्य खूप भावुक आहे हे सुद्धा तिला पटत नाही आणि ती थेट आदित्यला या बाबत जाब विचारते.
मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, “तू पारूबद्दल इतका इमोशनल का आहेस?, नेमकं काय नातं आहे तुमच्यामध्ये, प्लिज मला हे सांग”, असा प्रश्न अनुष्का आदित्यला विचारते. यावर आदित्य चिडून म्हणतो, “तू एक शिकलेली, वेलसेटल बिझनेस वुमन आहेस आणि पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली, या घरात नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली एक सामान्य मुलगी आहे. तुझी आणि पारूची कधीच तुलना होऊ शकत नाही”. आदित्यचं हे सर्व बोलणं पारू ऐकते आणि गैरसमज करुन घेते. पारूबद्दल आदित्यने केलेला हा विचार ऐकून ती खूप दुखावते.
सध्या मालिकेत आदित्य व पारूला पुरस्कार घोषित झाले आहेत हा ट्रॅक सुरु आहे. तर आदित्य पुरस्कार घेण्यासाठी जाणार असतो, मात्र मारुती पारूला आदित्यबरोबर जाण्यास नकार देतो. कारण दामिनीने पारू व आदित्यबाबत मारुतीच्या मनात विष कालवलेलं असतं. आता आदित्य मारुतीला विनंती करुन पुरस्कार सोहळ्याला तिला घेऊन जाण्याची परवानगी मिळवेल का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.