Chunky Pandey : आपल्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये बॉलीवूड तारकांना आमंत्रित करणे हा उद्योगपती व प्रभावशाली लोकांमध्ये लोकप्रिय ट्रेंड आहे. चित्रपट कलाकारही काही वेळेस अशा कार्यक्रमांना हजेरी लावतात. विशेषतः ही कलाकार मंडळी उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावताना दिसतात. अनेकदा एखाद्या मोठ्या शॉपिंग मॉल म्हणा वा हॉटेल, अन्यथा एखादा ज्वेलरी ब्रँड म्हणा या ठिकाणी ही कलाकार मंडळी आवर्जून उपस्थित राहतात आणि उपस्थितांची मनं जिंकतात. एकूणच शुभप्रसंगी ही कलाकार मंडळी उपस्थित असतात. मात्र, दुःखाच्या वेळीही या कलाकार मंडळींना आमंत्रित केलं जातं. काही लोक सेलिब्रिटींनाही अंत्यसंस्कारासाठी आमंत्रित करतात आणि यासाठी खूप पैसा खर्च करण्यास तयार असतात. बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेने याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे की एका कुटुंबाने त्याला अंत्यसंस्काराला हजर राहण्यासाठी पैसे दिले होते.
‘हाऊसफुल’ अभिनेता चंकी पांडेने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हा धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, त्याला कोणताही कार्यक्रम मिळाला की, तो त्यासाठी तयार व्हायचा आणि याच संदर्भात तो एकदा अंत्यसंस्काराला पोहोचला, त्यासाठी त्याला पैसेही दिले गेले. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे त्याला बोलावणारे कुटुंबीय तो रडला तर त्याची फी आणखी वाढवण्याची तयारीही त्या लोकांनी दर्शवली. चंकी म्हणाला, “जेव्हा मी एक अभिनेता म्हणून माझ्या करिअरची सुरुवात करत होतो, तेव्हा आमच्याकडे अतिरिक्त उत्पन्नाचा एकच स्रोत होता आणि तो म्हणजे कार्यक्रमांना उपस्थित राहणे. माझ्याकडे एक बॅग तयार असायची. मला कोणीही फोन केला की मी बॅग उचलायचो आणि लग्न असो, वाढदिवस असो किंवा मुंडन असो पळत सुटायचो”.
पुढे ते म्हणाले, “एके दिवशी सकाळी मला एका संयोजकाचा फोन आला, त्याने विचारले, आज काय करत आहात? मी म्हटलं की मी फक्त शूटिंगसाठी निघालोय. त्याने विचारले की शूट कुठे आहे आणि मी त्याला सांगितले, फिल्मसिटीमध्ये. मग तो म्हणाला, ‘भाऊ, वाटेत एक छोटासा कार्यक्रम आहे. फक्त १० मिनिटांचं काम आहे, पैसेही भरपूर मिळतील. यामुळे मी लगेच होकार कळवला. त्या ठिकाणी पोहोचलो आणि पाहिलं की, बाहेर पांढरे कपडे घातलेले बरेच लोक उभे होते. मी हळू हळू आत जाऊ लागलो आणि लोक माझ्याकडे बघत होते. ते आपापसात कुजबुजत होते की चंकी पांडे आला आहे. आणि मी विचार करत होतो की काय होत आहे. मी मृतदेह पाहिला आणि नंतर मला समजले की, ही अंत्यविधी आहे. मी भोळा होतो, मला वाटले की मी पोहोचलो तोपर्यंत आयोजक मरण पावला होता”.
त्यानंतर पुढे त्यांनी किस्सा सांगत म्हटलं की, “मी एका कोपऱ्यात आयोजकांना पाहिले आणि त्याला बोलावले, तो म्हणाला, ‘सर, काळजी करु नका, माझ्याकडे तुमचे पैसे तयार आहेत. पण तुम्ही रडलात तर जास्त पैसे देऊ असे कुटुंबीयांनी सांगितले आहे”. हे खरोखरच घडले होते, असे चंकी पांडेने यावेळी सांगितले. चंकीने १९८७ मध्ये ‘आग ही आग’ या मल्टीस्टारर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी ‘तेजाब’, ‘आँखे’, ‘तिरची टोपीवाले’, ‘दे दना दान’ आणि ‘हाऊसफुल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.