प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या ‘ओपेनहायमर’ या चित्रपटाचे समीक्षकांनी भरभरून कौतुक केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. किलियन मर्फीचा हा चित्रपट आता डिजिटल जगावरही राज्य करणार आहे. पुढील महिन्यात मार्चमध्ये हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तर जाणून घ्या हा बहुचर्चित चित्रपट कधी व कुठे पाहता येणार?
काही दिवसांपूर्वीच ‘ओपनहायमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि भारतात अनेक दिवस या चित्रपटाची प्रचंड चर्चा रंगली होती. अणूबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला असून भारतात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
काही मीडिया रीपोर्टनुसार अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी माध्यमाने ‘ओपनहायमर’चे हक्क विकत घेतले असून याच माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत एक नवीन अपडेट आली आहे.
‘जिओ सिनेमा’ या ओटीटी माध्यमाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘ओपनहायमर’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २१ मार्चपासून हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे. तसेच इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हाअ चित्रपट मोफत पाहायला मिळणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या प्रेमासह अनेक नामांकित पुरस्कारांवरदेखील आपली मोहोर उमटवली. ‘ओपनहायमर’ला अकादमी पुरस्कारांसाठी १३ नामांकने मिळाली. तर यंदाच्या ऑस्करसाठी सर्वाधिक नामांकने ओपनहायमर’लाच होती. लंडनमध्ये झालेल्या बाफ्टा फिल्म ओपनहायमर’ने ७ पुरस्कार जिंकले आणि क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्स २०२४ मध्ये एकूण ८ श्रेणींमधील पुरस्कार जिंकले. तर गोल्डन ग्लोबमध्येही ‘ओपेनहायमर’ने एकूण ८ पैकी ५ नामांकन मिळवले.