बॉलिवूड सिनेसृष्टीत अभिनयाची छाप सोडत लाखो प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. धक धक गर्ल या नावाने जबरदस्त अशी ओळख निर्माण करत माधुरीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. माधुरीचा खूप मोठा चाहतावर्ग असलेला पाहायला मिळतो. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारी ही माधुरी चाहत्यांच्याही संपर्कात राहत असते. सध्या अभिनेत्री एका डान्स रिऍलिटी शोचा एक भाग आहे. माधुरी दीक्षित व ॲक्शन हिरो सुनील शेट्टी हे दोघे ‘डान्स दिवाने’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये जज म्हणून पाहायला मिळत आहेत. (Madhuri Dixit Emotional)
प्रेक्षकही या डान्स रिऍलिटी शोला भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. दरम्यान, या शोच्या नुकत्याच समोर आलेल्या एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोन स्पर्धक परफॉर्म करताना दिसत आहे. त्यांचा परफॉर्मन्स पाहताक्षणी माधुरी दीक्षित व सुनील शेट्टीच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळत आहे. हा भावुक करणारा डान्स साऱ्या माधुरी व सुनील यांच्याशिवाय साऱ्या प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.
२०११मध्ये आलेल्या हृतिक रोशनच्या ‘अग्निपथ’ चित्रपटातील ‘अभी मुझे मैं कही’ या गाण्यावर दोन स्पर्धक थिरकताना दिसले. यावेळी जज बनून समोर बसलेल्या माधुरी दीक्षित यांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाल्या, ज्या पाहून त्यांचे चाहतेही भावुक झाले. यावेळी ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकीदेखील या कार्यक्रमाचा एक भाग बनला. मुनव्वर हा शो होस्ट करताना दिसला. सोशल मीडियावर भावुक करणारा व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, १८ वर्षांचा हर्षा आणि ८ वर्षांचा दिव्यांश जीवन व मृत्यूवर आधारित नृत्य करताना पाहून माधुरीला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर अभिनेत्री डोळे पुसताना दिसली. स्टेजवरील हा भावुक परफॉर्मन्स पाहून सुनील शेट्टी व माधुरी दोघेही दुःखी झाले. त्यानंतर दोघांनी या दोन्ही स्पर्धकांचे खूप कौतुक केलं. अल्पावधीतच या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.