Nupur Shikhare and Ira Khan Marriage : अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आयराने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह लग्नगाठ बांधली. दोघांनी नोंदणी पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा उरकला. त्यानंतर दोघांचा शाही रिसेप्शन सोहळा संपन्न झाला. जवळचे कुटुंबीय व सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत ही जोडी विवाहबंधनात अडकली. बऱ्याच दिवसांपासून आयरा व नुपूरच्या लग्नसोहळ्याची चर्चा सुरु होती. अखेर काल ३ जानेवारी २०२४ रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून आयरा व नुपूरच्या लग्नाची धामधूम सिनेसृष्टीत पाहायला मिळत होती. आयरा व नुपूरच्या लग्नसोहळ्याचे व लग्नापूर्वीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या दोघांच्या लग्नात आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी म्हणजेच किरण राव व रीना दत्ता यांनी सहभाग दर्शविलेला पाहायला मिळाला. नूपुरच्या हळदी समारंभासाठी दोघीही नऊवारी साडी नेसून पारंपरिक अंदाजात पाहायला मिळाल्या. आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शन सोहळ्यातील लूकची विशेष चर्चा रंगली. आयरा खानने लग्नात धोती चोली असा हटके ड्रेस परिधान केला होता. तसेच तिने या ड्रेसवर कोल्हापुरी चप्पल घातली होती. तर नुपूरने रिसेप्शनसाठी कुर्ता पायजमा असा साधा लूक केला होता. दोघांचा साधा लूक पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. तर काहींनी त्यांच्या साधेपणाचं कौतुकही केलं.
आयरा व नुपूर यांचा रिसेप्शन लूक पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करत चांगलंच धारेवर धरलं. एका नेटकऱ्याने कमेंट करत, “खूप वाईट ड्रेसिंग केली आहे” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने, “आमिर तसेच त्याची लेक यांना ड्रेसिंगच भान नाही” अशी कमेंट केली आहे. एका युजरने, “पहिलीच नवरी आहे जी नवरीसारखी दिसत नाही आहे”, तर एकाने, “साधेपणा आहे हे माहित आहे, पण ड्रेसिंगच काहीतरी भान असावं” असंही म्हणत त्यांना ट्रोल केलं आहे.

येत्या सहा ते दहा जानेवारी दरम्यान आयरा व नुपूर यांच्या दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. यापैकी एक रिसेप्शन दिल्ली येथे तर दुसरे रिसेप्शन जयपूरमध्ये होणार असल्याचे म्हटलं जात आहे. या रिसेप्शन सोहळ्यात शाहरुख खानपासून ते सलमान खानपर्यंत सर्व मोठे कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.