सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात कलाकारांची वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत येत असतात. सोशल मीडियावर कलाकारांकडून शेअर केल्या जाणाऱ्या फोटो व व्हिडीओमुळे अनेकदा त्यांचे आयुष्य नकळत त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचत असते आणि चाहतेही आपल्या आवडत्या कलाकारांचं खासगी आयुष्य जाणून घेण्यात अधिक उत्सुक असतात. मात्र, काही कलाकार त्यांच्या नात्याबाबत उघडपणे बोलताना दिसतात. तर काही आपल्या खासगी आयुष्याबाबात न बोलणंच पसंत करतात. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे तितिक्षा तावडे. (Titeekshaa Tawde On Her Relationship)
तितिक्षा सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील तितिक्षाची नेत्रा ही भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडते. अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती कायम चर्चेत राहत असते. आपल्या अभिनयामुळे व स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत राहणारी ही अभिनेत्री अनेकदा अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबरच्या अनेक फोटोमुळेही चर्चेत आली आहे. तितिक्षा सिद्धार्थबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना अनेकदा उधाण आलं असल्याचे पाहायला मिळाले आहे.
अशातच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तितिक्षाने तिच्या व सिद्धार्थबरोबरच्या नात्यावर खुलासा केला आहे. यावेळी तितिक्षाला “सोशल मीडियावर सिद्धार्थ व तितिक्षा एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक चर्चा रंगताना पाहायला मिळतात याबद्दल तुझं काय मत आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती उत्तर देत असं म्हणाली की, “आम्ही खूप जुने मित्र आहोत. आम्ही गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखत असून आम्ही दोघांनी आमच्या संघर्षाला एकत्र सुरुवात केली होती. २०१५ साली ‘असे हे कन्यादान’ मालिकेत मुख्य कलाकारांच्या मित्र-मैत्रिणींची भूमिका साकारत होतो. त्या मालिकेपासूनची आमची मैत्री आहे. आम्ही दोघांनी आमच्या संघर्षाचा प्रवास एकत्र पाहिला आहे. तसेच आम्ही हल्ली आमचे एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्यामुळे लोकांना आम्ही रिलेशनमध्ये असल्याचे वाटत असावे”
दरम्यान, तितिक्षा व सिद्धार्थ यांचे एकमेकांबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले आहेत. तसेच दोघांच्या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनीदेखील अनेकदा ते दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र, अभिनेत्रीने आता याबद्दल स्वत: खुलासा केला असून सिद्धार्थ व तितिक्षा यांच्यामध्ये मैत्रीशिवाय कोणतेही नाते नसल्याचे मत तितिक्षाने व्यक्त केले.