Nora Fatehi On California Fire : अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या आसपासच्या जंगलात गुरुवारी लागलेली आग संपूर्ण शहरात पसरु लागली आहे. लॉस एंजेलिसच्या इतिहासात अशी आग कधीच लागली नव्हती. अमेरिकेतील फिल्म इंडस्ट्रीचा प्रसिद्ध बालेकिल्ला असलेल्या हॉलिवूडलाही या आगीची धग लागली. अनेक चित्रपट सेलिब्रिटींची घरेही जाळली. IANS नुसार, या आगीत सुमारे २००० इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि १ लाख ३७ हजारांहून अधिक लोकांनी आपली घरे सोडली आहेत. पॅरिस हिल्टन, बिली क्रिस्टल यांसारख्या अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी या आगीत आपली घरे गमावली आहेत. बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीने इन्स्टा स्टोरीवर या आगीबद्दलचा तिचा वेदनादायक अनुभव शेअर केला आहे. एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिच्या अनुभवाबद्दल बोलताना दिसत आहे.
व्हिडीओ शेअर करत नोरा म्हणाली, “मित्रांनो, मी लॉस एंजेलिसमध्ये आहे आणि जंगलात भीषण आग लागली आहे. मी यापूर्वी असे काहीही पाहिले नव्हते. हा वेडेपणा आहे. आम्हाला ५ मिनिटे अगोदर येथून जाण्यास सांगितले आहे. म्हणून मी माझे सर्व सामान पटकन पॅक केले आणि मी येथून निघत आहे. मी विमानतळाजवळ जाऊन विश्रांती घेईन. आज माझी फ्लाइट आहे आणि मला आशा आहे की मी ते पकडू शकेन”.

ती पुढे म्हणाली की, “मला आशा आहे की फ्लाईट रद्द केली जाणार नाही कारण इथे खूप भयानक परिस्थिती आहे. हा अनुभव मी यापूर्वी कधीच घेतला नव्हता. मी तुम्हाला अपडेट देत राहीन. आशा आहे की मी वेळेत बाहेर पडू शकेन”. प्रियांका चोप्रानेही तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. लोकांचे रक्षण करण्यात गुंतलेल्या बचाव कर्मचाऱ्यांबद्दल अभिनेत्रीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रियंकाने असं म्हटलं आहे की, “विश्वसनीयपणे धाडसी प्रथम प्रतिसादकर्त्यांना खूप धन्यवाद. लोकांना मदत करण्यासाठी रात्रभर अथक परिश्रम केल्याबद्दल आणि पीडित कुटुंबांसाठी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद”.

आगीमुळे ऑस्कर नामांकन मतदानाची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. व्हरायटीच्या अहवालानुसार, अंदाजे १०,००० अकादमी सदस्यांसाठी मतदान ८ जानेवारीला सुरु झाले आणि १२ जानेवारी रोजी संपणार होते. आता ही मुदत १४ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर १७ जानेवारीला उमेदवारी जाहीर होणार होती, ती १९ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.