Urmila Kothare Post : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या गाडीचा भीषण अपघात झाला असल्याचं समोर आलं. शुटींग संपवून घरी परतत असताना उर्मिलाच्या कारचा हा अपघात झाला. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. उर्मिलाच्या कारने दोघांना धडक दिली असून या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी असल्याचं समोर आलं. यावेळी अभिनेत्रीलाही गंभीर दुखापत झाली तर तिच्या ड्रायव्हरलाही या अपघाताचा फटका बसला. या दुर्दैवी घटनेतून उर्मिला बचावली आहे. आणि आता उपचारानंतर ती आता सुखरुप तिच्या घरी पोहोचली आहे. याबाबतची पोस्ट अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली आहे.
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये लेक जिजा व वडिलांबरोबर गणपती बाप्पाचे दर्शन घेत आहेत आणि या अपघातातून वाचवल्यामुळे त्यांचे आभार मानताना दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करत त्यांनी असं म्हटलं की, “२८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १२.४५ च्या सुमारास माझा कार अपघात झाला. पोईसर मेट्रो स्थानकाजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा प्रकार घडला जेथे रात्री मेट्रोचे काही काम केले जात होते आणि वरवर पाहता मोठी यंत्रसामग्री आणि एक जेसीबी लोडर/ उत्खनन उभे होते.
पुढे त्याने असं म्हटलं की, “माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता. त्यावेळी तिथे एक आंधळं वळण आलं, ज्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. या धडकेनंतर मी आणि माझा ड्रायव्हर गंभीर जखमी झालो आणि बेशुद्ध पडलो. सुदैवाने, आम्हाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई पोलीस आणि डिलिव्हरी कर्मचारी श्री पवन शिंदे यांनी तातडीने कारवाई करुन आम्हाला रुग्णालयात हलवले. मी आता घरी आहे. मला अजूनही पाठीच्या आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि मला डॉक्टरांनी किमान ४ आठवडे कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे”.
यापुढे तिने ही माहिती एफआयआरनुसार दिल्याचं म्हणत म्हटलं की, “बाप्पाचे कृतज्ञ. माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभारी आहे जे काळजीत होते आणि मी लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत होते. हा एक गंभीर अपघात होता आणि पोलिसांनी माझ्या ड्रायव्हरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. माझा आमच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे की न्यायाचा विजय होईल. ही विधानं पोलिस एफआयआर नुसार आहेत”.