सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचं २ ऑगस्ट रोजी निधन झालं. देसाई यांच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली. अद्याप नितीन यांच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत जीवन संपवलं. या सगळ्यात आणखी एक मनाला चटका लावणारी बाब समोर आली आहे. त्यांच्या वाढदिवसाला अवघे चार दिवस असतानाच त्यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. (Nitin Desai Friend On Her Death)
नितीन देसाई यांचा ६ ऑगस्टला वाढदिवस असतो. मात्र वाढदिवसाच्या चार दिवस आधीच त्यांनी मृत्यूचा निर्णय घेतला. त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नितीन यांनी त्यांची पत्नी आणि मुलीला आधीच सांगितले होते की ते यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाहीत, मात्र त्यांच्या बोलण्याचा अर्थ इतका मोठा असेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.
पाहा नितीन देसाई यांच्या मित्राने केला मोठा खुलासा (Nitin Desai Friend On Her Death)
नितीन देसाई यांचे जवळचे सहकारी नितीन कुलकर्णी यांनी नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली, यावेळी त्यांनी असे म्हटलं की, “देसाई यांचा वाढदिवस ६ ऑगस्टला होता. त्यामुळे त्यांच्या पत्नीने आणि मुलीने असा आग्रह धरला होता की मुलगी अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांचा वाढदिवस साजरा केला जावा. पण देसाई यांनी त्यांना सांगितले की, यावर्षी ते त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाहीत. कोणी स्वप्नांतही विचार केला नव्हता की वाढदिवस साजरा न करणे म्हणजे असे काहीतरी भयानक असेल.’ असं नितीन कुलकर्णी यांनी म्हटलं.
नितीन देसाई यांनी आर्थिक दृष्टिकोनातून आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. कोटींच्या घरात त्यांच्यावर कर्ज होतं, आणि ते भरण्याची मागणी ही कर्जदारांकडून करण्यात येत होती. याबाबत बोलताना नितीन देसाई यांचे जवळचे सहकारी नितीन कुलकर्णी म्हणाले की, “मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहे”.

“ज्यामुळे नितीन देसाईंच्या पत्नीला यातून योग्य मार्ग काढण्यास मदत होईल. शिवाय कर्जदार कंपनीकडून त्यांना छळ किंवा दबावाचा सामना करावा लागणार नाही. ज्या दिवशी देसाई दिल्लीहून परतले आणि स्वत:चा जीव घेतला, त्या दिवशी त्यांनी स्टुडिओ वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न केला. देसाई यांच्यावर फायनान्स कंपनीने एवढा दबाव टाकला होता की त्यांना आता हा ताण सहन होत नव्हता”, अशी नितीन कुलकर्णी यांनी सांगितलं.