धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. अभिनेता प्रसाद ओक याने या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यांनतर आता चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय आनंद दिघे यांनी केलेली कामगिरी व समाजकार्य या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं पोस्टर प्रसादने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केलं आहे. (Prasad Oak on Dharmveer 2)
प्रसादने सोशल मीडियावरुन चित्रपटाचे पोस्टर शेअर करत एक खास पोस्ट शेअर केली आहे. “सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार… “धर्मवीर २” मधून उलगडणार ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…’ असं कॅप्शन देत त्याने ही पोस्ट केली आहे. दरम्यान या पोस्टखाली प्रेक्षकांनी कमेंट करत चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा, अशी मागणी केली आहे. मात्र काहींनी नकारात्मक कमेंट केल्या आहेत.
पाहा प्रसाद ओकच्या पोस्टवर नेटकरी काय म्हणाले (Prasad Oak on Dharmveer 2)
एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “आनंद दिघे यांचच कर्तृत्व दाखवा म्हणजे झालं. नाहीतर ऐन निवडणूकीच्या काळात हा चित्रपट कमी आणि दिघेंच्या नावावर कुणाच तरी पेड प्रमोशन वाटायला नको. आनंद दिघे यांची पुण्याई कुणा दुसऱ्याच्या अति महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी वापरली जाऊ नये एवढंच”. तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “नक्की सिनेमा दिघे साहेब आणि त्यांनी केलेल्या सर्व कामांवर आहे का? कारण दिघे साहेबांच नाव घेऊन खूप जण आपले विचार आणि आचार विकत आहेत”. तर आणखी एका युजरने म्हटलंय की, प्रसादजी तुम्ही पुन्हा एकनाथ शिंदे यांना प्रमोट करत आहात?
हे देखील वाचा – “साहेबांच्या हिंदुत्वाची…” धर्मवीर २ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित!
‘धर्मवीर’ चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रसाद ओकने साकारलेल्या भूमिकेचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळालं. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा जेजुरी गडावर करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे व निर्माते मंगेश देसाई यांनी ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले. ‘धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ असे चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं नाव असणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. जेजुरी येथील खंडोबा देवस्थान येथे या पोस्टरचे अनावर करण्यात आले आहे.
‘धर्मवीर’ चित्रपटातील पहिल्या भागातील कलाकारांच्या अभिनयाने, चित्रपटातील गाण्यांनी चित्रपटाला एका वेगळ्याच स्थरावर नेऊन ठेवलं. आता चित्रपटाच्या आगामी भागात धर्मवीर आनंद दिघे यांचं हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि त्यासाठी त्यांची धडपड दाखवण्यात येणार आहे.