बॉलीवूड व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गेल्या २ ऑगस्ट रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. तर ४ ऑगस्ट रोजी कर्जत येथील एन.डी. स्टुडिओ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांसह चित्रपटसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे खरे कारण अदयाप तरी समोर आले नसले, तरी या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसेच पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Nitin Desai Suicide)
गेल्या ६ ऑगस्ट रोजी नितीन देसाई यांचा ५८ वा वाढदिवस होता. मात्र वाढदिवसाच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी आपलं जीवन संपवले. ज्या कला दिग्दर्शकाने त्यांचे बहुतेक वाढदिवस जिथे साजरे केले, त्या एन.डी. स्टुडिओमध्येच त्यांचा यंदाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला असल्याचे एका जवळच्या व्यक्तीने ई-टाईम्सशी बोलताना सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी नितीन देसाई यांचे कुटुंबीय व एन.डी. स्टुडिओतील कर्मचाऱ्यांकडून नितीन देसाईंच्या फोटोला पुष्पहार अर्पण केले. तसेच त्यांच्या स्मरणार्थ एक छोटीशी पुजा ठेवण्यात आली. (Nitin Desai Birth Anniversery)
हे देखील वाचा – “बाबांकडे कामंच नव्हतं कारण…”, नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर मुलीची पहिली प्रतिक्रिया, रडत म्हणाली, “महाराष्ट्र शासनाला…”
नितीन देसाई यांच्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज असल्याचं तसेच आर्थिक अडचणींमधून त्यांनी आत्महत्या केल्याच्या विविध चर्चा रंगत होत्या. दरम्यान, त्यांची मुलगी मानसी देसाईने त्यांच्या या प्रकरणावर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी मानसी म्हणाली होती की, नितीन देसाईंवर १८१ कोटी रुपयांचं कर्ज होतं. त्यापैकी ८१ कोटी रुपयांचं कर्ज फेडलं होतं. मात्र कोरोनामुळे स्टुडिओ बंद असल्यामुळे उर्वरित कर्जाची परतफेड करणे शक्य नव्हते. मात्र तरीही कंपनीने आमच्याकडून सहा महिन्याचं आगाऊ पेमेंट मागितले, तेव्हा त्यांनी पवईचं ऑफिस विकून ती मागणी पूर्ण केल्याचे सांगत तिने एनडी स्टुडिओ राज्य शासनाने ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.
हे देखील वाचा – “मराठी माणसाला कोणी मोठं झालेलं बघवत नाही”, नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर सुबोध भावेचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “तो इथे…”
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिंदी व मराठी चित्रपटांचे कला दिग्दर्शन केलेले आहेत. ज्यात ‘देवदास’, ‘लगान’, ‘हम दिल दे चुके सनम’ हे हिंदी व ‘बालगंधर्व’, ‘अजिंठा’ या मराठी चित्रपटांचा समावेश आहे.