‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व निक्की तांबोळीने तुफान गाजवलं. पहिल्याच दिवशी शोमध्ये निक्की अन् वर्षा उसगांवकरांचे वाद झाले होते. त्यामुळे हा सीझन सुरू झाल्यापासून निक्की प्रचंड चर्चेत होती. हळुहळू तिचे घरातील डायलॉग सोशल मीडियावर लोकप्रिय होऊ लागले. “बाईSSS हा काय प्रकार” या डायलॉगने तर गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असूनही निक्कीला ‘बिग बॉस’च्या घरात उचलेल्या काही चुकीच्या पाऊलांमुळे विजेतेपद गमवावं लागलं. तरीही तिच्या चाहत्यांना शेवटपर्यंत निक्की हा शो जिंकेल अशी अपेक्षा होती. मात्र, सूरज चव्हाणने यंदाच्या पर्वावर आपलं नाव विजेता म्हणून कोरलं आहे. (Nikki Tamboli Will Visit Suraj Chavan Hometown)
बिग बॉसच्या घरात सूरजचे सर्वांबरोबर खास नाते असल्याचे पाहायला मिळाले. त्याने घरातील सदस्यांना त्याच्या कुटुंबाचं एक हिस्सा मानलं होतं. वर्षा उसगांवकरांना तो आई मानायचा, तर पॅडी यांना त्याने त्याच्या आप्पांचा दर्ज दिला होता. तसंच निक्की व अंकिता यांना सूरजने बहीण मानले होते. रक्षाबंधन विशेष भागात निक्कीने सूरजला राखी बांधत स्वत:ला त्यांची बहीण मानले होते. त्यानंतर सूरजच्या बहीणी व आयत्या घरात आल्या असताना निक्कीने मी तुमच्या गावी येणार असल्याचे म्हटलं होतं. अशातच निक्कीने पुन्हा याबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इट्स मज्जाशी साधलेल्या खास संवादात निक्की असं म्हणाली की, “सूरजच्या आत्या व बहिणींना मला खूप प्रेम दाखवलं होतं. सूरज बहीणींच्या मुलांनीही मला खूप प्रेम दिलं. तर मला त्याच्या गावी जायला आवडेल. गायी, म्हशी आणि बकऱ्यांबरोबर खेळायला आवडेल. कोंबड्या पकडायला मला आवडेल. कारण मीही एका गावामधून आलेली आहे. तर मला त्याच्याबरोबर गावी राहायला आवडेल. ‘बिग बॉस’च्या घरात आमचं भाऊ-बहीणीचं नातं होतं तेच नातं मला बाहेरच्या जगात निभावायलाही आवडेल”.
आणखी वाचा – Video : इरीना-वैभव यांनी घेतली सूरजची भेट, तिघांनी एकत्र डान्सही केला अन्…; व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या टॉप ६ स्पर्धकांमध्ये बाजी मारत सूरजने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकली. तसेच निक्की तांबोळी ही टॉप ३ मध्ये येऊन तिला घरातून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर निक्कीने इन्स्टाग्रामवर तिच्या ब्रॉडकास्ट चॅनलवरुन चाहत्यांसाठी एक मेसेज शेअर केला. ट्रॅाफी जरी त्याच्याकडे असली तरीही धमाका माझ्याच नावाचा सुरु असल्याचं निक्कीने म्हटलं होतं.