Nidhi Seth On Marriage : बॉलिवूड असो वा छोटा पडद्यावरील कलाकार यांच्यात घटस्फोटांचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. लवकर लग्न आणि नंतर घटस्फोट हा इंडस्ट्रीचा नवा ट्रेंड बनला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. टीव्ही अभिनेत्री निधी सेठला तिच्या घटस्फोटानंतर अवघ्या सात महिन्यांत नवीन प्रेम सापडले आणि आता तिने ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेता करणवीर मेहराबरोबरचे लग्न आपली सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. अभिनेत्रीने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या माजी पतीबरोबरच्या लग्नाबद्दल भाष्य केलं. निधी सेठने प्रसिद्ध अभिनेता करणवीर मेहराबरोबर मोठ्या थाटामाटात लग्न केले होते.
दोघांनीही छोट्या पडद्यावरील अनेक शोमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. अभिनेत्री निधी सेठ आता घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यात पुढे सरकली आहे. आणि अवघ्या सात महिन्यांनंतर ती पुन्हा प्रेमात पडली आहे. निधीने अभिनेता करण वीर मेहराबरोबर लग्न केले, पण लग्नाच्या अडीच वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. आता नव्या प्रेमाच्या प्रवेशानंतर निधीने तिच्या एका मीडिया इंटरव्ह्यूमध्ये अभिनेत्याबरोबरच्या लग्नाबद्दल बोलताना सांगितले की, अभिनेत्याशी लग्न करण्याचा तिचा आयुष्यातील निर्णय हा चुकीचा निर्णय होता. अचानक तिला वाटले की सर्व काही ठीक होत नाही, म्हणून ती त्या नात्यातून बाहेर पडली.
निधी सेठने मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिच्या प्रत्येक निर्णयाला तिच्या कुटुंबाने पाठिंबा दिला होता. हेच त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम मिळाल्याबद्दल, अभिनेत्री म्हणाली की ती खूप भाग्यवान आहे की प्रेमाने तिच्या आयुष्यात पुन्हा दार ठोठावले आहे. याबरोबरच अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचे नाते स्वीकारले आहे आणि ते दोघेही खूप आनंदी आहेत. निधीने नुकताच तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता, ज्यावर लोक तिचे अभिनंदन करत होते.
घटस्फोटानंतर निधी सेठ आपल्या कुटुंबासह राहण्यासाठी बंगळुरूला गेली होती. आता ती कायमची तिथे शिफ्ट झाली आहे. मुंबईहून निघताना अभिनेत्री म्हणाली की ती तिच्या कामासाठी मुंबईत येतच राहणार आहे. पण आता ती बंगळुरूमध्येच राहू लागली आहे. करणवीर व निधी या दोघांनीही इन्स्टाग्रामवरुन त्यांच्या लग्नाचे फोटो व फोटो डिलीट केले आहेत आणि आता दोघेही आपापल्या आयुष्यात खूप आनंदी आहेत.