‘महाराष्ट्र शाहीर….’ गीत संगीताने बहरला

Maharashtra Shaheer Movie Review
Maharashtra Shaheer Movie Review

ज्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल रुपेरी पडद्यावरील गोष्ट जाणून घेण्यास चित्रपट रसिकांना विशेष उत्सुकता हवी. अशी व्यक्ती अगदी कोणत्याही क्षेत्रातील असो, ती व्यक्तीरेखा साकारण्यास/पेलण्यास योग्य कलाकाराची निवड करणे. यात काळाचे भान ठेवून कला दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा इतकेच नव्हे तर पूर्वप्रसिध्दीही हवी. केदार शिंदेने आपले आजोबा महाराष्ट्र शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर ‘ हा चित्रपट घडवताना अर्थात दिग्दर्शित करताना या सगळ्याचे निश्चितच भान ठेवले आहे. (Maharashtra Shaheer Movie Review)

शाहीर साबळे हे लोकगीत, मुक्त नाट्य, लोकनाट्य म्हणून परिचित आहेत. विशेषत: जय जय महाराष्ट्र माझा, येळकोट येळकोट जय मल्हार, जेजुरीच्या खंडेराया जागराला या या, अगं अगं अग विंचू चावला, या गो दांड्यावरनं पोरी नवरा कुणाचा येतो अशी त्यांची किती गाणी समाजातील सर्वच स्तरांत पोहचली आहेत. अगदी सर्वकालीन लोकप्रिय आहेत. पण त्यांचे स्वातंत्र्यपूर्व काळात आयुष्य कसे आणि कुठे सुरु झाले, त्यातील संघर्ष, त्यांना आपल्या घरातूनच असलेला विरोध ( विशेषत: हा किसना अगदी लहानपणापासून गातोय हे आईलाच आवडत नाही. त्याला आजीकडे ठेवले असता साने गुरुजींचे किसनाला आशीर्वाद असले तरी आजीचा विरोधच असतो),अशातच त्याची काॅलेजमध्ये भानुमतीशी ओळख होते. तिची गीते आणि किसनाचे गायन असा प्रवास सुरु होतो. किसनाच्या घरचा विरोध असूनही ते लग्न करतात.

एकिकडे किसनाचे गायनातील यश आणि दुसरीकडे संसारात चार मुले. पण एकदा मुंबईत एका कार्यक्रमाच्या वेळेस शाहीरांचा सत्कार होताना भानुमती दुर्लक्षित होते. ती दुखावते. आपल्या गाण्यांवर शाहीराची कारकीर्द घडली, फुलली, आकाराला आली आणि तरीदेखील आपण दुर्लक्षित? या क्षणापासून ती वेगळी राहू लागते आणि शाहीरांचा प्रवास आणखीन एक वळण घेतो. चित्रपटाच्या उत्तरार्धात बाळासाहेब ठाकरे यांच्या आग्रहास्तव शाहीरांनी लिहिलेल्या ‘आंधळ दळतयं ‘ या लोकनाट्यावरुन गैरसमज करुन घेऊन मुंबईत झालेली भीषण दंगल, शाहीरांचा पडता काळ, अगदी कंपनीची गाडी विकायची आलेली दुर्दैवी वेळ अशा अनेक गोष्टी चित्रपटात येतात.

असा होता शाहिरांचा प्रवास

चित्रपट पाहताना एक गोष्ट जाणवते की, कृष्णराव गणपतराव साबळे यांचा खूप मोठा जीवन प्रवास अंमळनेर, पसरणी, पंढरपूर, मुंबई ( विशेषत: काळा चौकी) असा बराच मोठा आहे. खूपच चढउतार आहेत. ते खरंच १५० मिनिटांच्या चित्रपटात मावतील का? त्यामुळेच फारसं खोलवर न जाता एकामागोमाग एक घटना घडत जातात आणि त्यात शाहीरांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांचे मुखडे, कधी स्वतंत्र गाणी येतात. आणि शाहीरांचा संबंध अनेकांशी येत जाताना घटनाही वाढतात. मग ती भेट तात्कालिक मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची असो अथवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झालेली पहिली भेट असो. महाराष्ट्र राज्याची स्थापना, शिवसेनेचा पहिला वर्धापनदिन असे अनेक तपशील यात आहेत. ते जुन्या काळात नेतात.

image credit google

गाणं हा शाहीरांचा श्वास असल्याने चित्रपटात त्यांचा भरपूर वाव आणि जणू ते एक व्यक्तिमत्व ठरलयं. त्यांचे रुपेरी सादरीकरणही झक्कास. अंकुश चौधरीने अतिशय मनापासून शाहीर साकारलेत. त्याने मेहनत घेतलीय आणि केदारनेही त्याच्यावर मेहनत घेतलीय. सना केदार शिंदेने भानुमती साकारलीय. तिनेही उत्तम अदाकारी केलीय. यासह अनेक लहान मोठ्या व्यक्तिरेखांसह चित्रपट घडतो. प्रतिमा कुलकर्णी यांची पटकथा व संवाद आणि अजय अतुल यांचे संगीत या जमेच्या बाजू ठरल्यात. संवाद चमकदार आहेत.

आणि म्हणून येईल यश(Maharashtra Shaheer Movie Review)

संजय छाब्रिया यांची एव्हरेस्ट एन्टरटेन्मेन्ट आणि केदार शिंदे प्राॅडक्सन्सच्या या बिगबजेट चित्रपटाची दणदणीत पूर्वप्रसिध्दी झाली आहे. आजूबाजूच्या समाजकारण आणि राजकारण याचेही चित्रपटात भान ठेवले गेले आहे आणि ही गोष्ट फ्लॅशबॅक तंत्राने पडद्यावर साकारली आहे. तरी एक गोष्ट सांगावीशी वाटते, दक्षिण मध्य मुंबईतील कामगार मैदानावर या चित्रपटाचा अतिशय जोरदार इव्हेन्टस झाला असता तर या चित्रपटासाठीच्या मध्यमवर्गीय कुटुंबात हा चित्रपट लवकरच पोहचला असता. अर्थात मधुहास गाण्यावर इतक्या जणांनी सोशल मिडियात रिल पोस्ट केलीत की चित्रपटासाठी पूरक वातावरण निर्माण झालयं आणि चित्रपटातही ते गाणे येताच रंगत अधिकच वाढते.


शाहीर साबळे यांचे अफाट कर्तृत्व एकाच चित्रपटात मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न मराठी माणसाने एकदा आवर्जून अनुभवावा. महाराष्ट्र शाहीरांना दाद द्यावी.

 दिलीप ठाकूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *