बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही तिच्या दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर चांगलीच चर्चेत आली आहे. अनुष्काने तिच्या बाळाचे नाव अकाय असे ठेवले असून त्याच्या नावाची चर्चादेखील सोशल मीडियावर रंगली आहे. अशातच अनुष्काचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्काने आपले कुटुंब व मुलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनुष्काच्या जुन्या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या असून खरंच अनुष्का अभिनय सोडण्याचा निर्णय घेईल का? असे प्रश्न निर्माण केले आहेत. (Anushka sharma on acting)
अभिनेत्री सिम्मी गरेवाल यांच्या चॅट शोमधील अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने लग्न व मुलांबद्दल भाष्य केले होते. सिम्मी गरेवाल यांनी तिला विचारले की, “तुझ्या आयुष्यात लग्नाचे महत्त्व किती आहे?”, त्यावर अनुष्का म्हणाली की, “माझ्या आयुष्यात लग्नाचे खूप महत्त्व आहे. मला लग्न करायचे आहे. मला माझी मुलं हवी आहेत. तसेच जेव्हा मी लग्न करेन तेव्हा मी कदाचित चित्रपटांमध्ये काम करणार नाही”.
अनुष्काच्या या व्यक्तव्यावर आता अनेक चर्चा रंगल्या आहेत. “खरंच अनुष्का आता चित्रपट करणार नाही का?”, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. २०१८मध्ये अनुष्का आनंद एल राय यांच्या ‘झीरो’ या चित्रपटामध्ये शाहरुख खानसह दिसली होती. तसेच वरुण धवनबरोबर ‘सुई धागा’ या चित्रपटामध्येही ती दिसली होती. तसेच निर्माती म्हणून तिने ‘बुलबुल’, ‘पाताल लोक’, ‘एनएच १०’, ‘परी’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र मुलगी वामिकाच्या जन्मानंतर मात्र ती सिनेसृष्टीपासून खूप दूर गेली.
अनुष्काची लेक वामिका जेव्हा मोठी झाली तेव्हा तिने ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. महिला क्रिकेटर झुलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्काला पुन्हा एकदा चित्रपटात पाहणं रंजक ठरणार आहे. २०१७ मध्ये अनुष्काने भारतीय क्रिकेटर विराट कोहलीबरोबर लगीनगाठ बांधली. लग्नानंतर अभिनेत्रीने स्वतःच्या कौटुंबिक आयुष्यावर लक्ष देण्यास सुरुवात केली.