मराठी सिनेसृष्टीतील देखणे व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेते रवींद्र महाजनी. रवींद्र महाजनी यांच्या सौंदर्याचा आजही खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या रुबाबदार व देखणेपणावर भाळणारे अनेक चाहते आजही रवींद्र महाजनींची आठवण काढतात. इतर स्त्रियांना आपल्या देखणेपणाने आकर्षित करणारे रवींद्र महाजनी त्यांच्या पत्नीबाबत मात्र खूपच असुरक्षित होते आणि स्वत: माधवी महाजनींनी याचा खुलासा केला आहे.
माधवी यांनी नुकतीच ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत माधवी यांना “रवींद्र महाजननींना तुमच्याबाबत असुरक्षितता वाटली आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत माधवी यांनी असं म्हटलं की, “हो. रवीला माझ्याबाबत खूपच असुरक्षितता वाटायची. त्याचा पुढे मला त्रास झाला. त्याच्या आयुष्यात इतक्या सुंदर बायका असूनही त्याला माझ्याबाबत असुरक्षितता वाटणे हे आश्चर्यच आहे. त्याला मी सुंदर नाही आहे असं कधीच वाटलं नाही. लग्नानंतर रवींद्र यांनी मला पावडर, लिपस्टिक किंवा मेकअप करू दिला नाही. त्याचा एखादा मित्र माझ्या बाजूला बसलेलाही त्याला चालायचं नाही.”
आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवरील खराब कामगिरीमुळे अवघ्या ४० दिवसांतच ‘लाल सलाम’ ओटीटीवर, वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “एरव्ही रवींद्र, माझ्या सासू आजूबाजूला असताना किंवा पार्टीमध्ये वगैरे बसलेलं त्याला चालायचं. पण मी बसले असताना त्याचा कुणी मित्र आला आणि जवळपास जागा असतानादेखील तो माझ्या इथे बसला तर त्यांना ते आवडायचं नाही. रवींद्र त्या मित्राशी हळहळू मैत्री तोडून टाकायचा. इतकं त्याला माझ्या बाबतीत असुरक्षित वाटायचं. मी रवींद्र महाजनी आणि ही माझी बायको आहे हा याबाबत त्याला अभिमान होता.”
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री संभावना शेठच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “खूप दुःख…”
पुढे माधवी यांनी असं म्हटलं की, “पण मी रवींद्रबाबत कधीही असुरक्षित झाले नाही. त्यांचे सिनेमातील बायकांशीच अफेअर्स होते, मी आता त्यांची नावे घेऊ शकत नाही. पण त्यावेळी त्यांच्यात काही समस्या निर्माण झाली तर त्या समस्या मीच सोडवल्या होत्या. त्या आमच्या घरी येऊन मला सांगायच्या की आम्ही लग्न करतो, आपण एकत्र राहुया असं म्हणायच्या. त्यावर मी त्यांना म्हणायचे की माझी सासूबाईंना हे अजिबातच चालणार नाही. त्यामुळे तुम्ही मला कितीही सांगितलं तरी त्याचा काही उपयोग नाही. रवींद्रही त्यांच्या गळ्यापर्यंत गोष्टी आल्यावर माझ्याकडे घेऊन यायचे आणि मीही त्या निस्तरायचे.”
दरम्यान, माधवी महाजनी यांचा नुकताच ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून या पुस्तकातून त्यांनी रवींद्र यांच्याबद्दलचे अनेक किस्से सांगितले आहेत. तसेच नुकत्याच आलेल्या या मुलाखतीतही माधवी यांनी रवींद्र महाजनींविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.