झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत असतात. धांदरट लीला व शिस्तप्रिय एजे यांची ही अनोखी जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावते. त्यामुळे दोघांमधील केमिस्ट्री पाहण्यात प्रेक्षकांना चांगलाच आनंद मिळतो. मालिकेत नुकतीच एजेला अखेर जाणीव झाली आहे की त्याचं लीलावर प्रेम आहे. लीलावरचे प्रेम जाहीर करण्यासाठी एजे कष्टही घेताना दिसत आहेत. अशातच आता लीलाने एजेसाठी खास उखाणा घेतल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. झी मराठीच्या एका खास कार्यक्रमात लीलाने एजेसाठी हा उखाणा घेतला आहे. (leela makar sankrant ukhana)
‘झी मराठी’ वाहिनीवर मकरसंक्रांत विशेष कार्यक्रम पार पडला. यामध्ये वाहिनीवरील सगळ्या मालिकांमधले कलाकार एकत्र येऊन संक्रांत साजरी करत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मालिकेच्या प्रत्येक मुख्य अभिनेत्रींनी आपल्या जोडीदारांसाठी खास उखाणे घेतले आणि याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी लीलानेही एजेसाठी खास उखाणा घेतला. तिचा हा उखाणा ऐकून सर्वजण तिचं कौतुक करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये लीला एजेसाठी उखाणा घेत असं म्हणते की, “एजे हे खास तुमच्यासाठी. एजे तिळासारखे कडू, मी गुळासारखी गोड, एजे तिळासारखे कडू, मी गुळासारखी गोड… आमच्यात लुडबूड करण्याऱ्यांची मी मोडेन चांगलीच खोड”. तिच्या या उखाण्याला ‘सावल्याची जणू सावली’ मधली सावली, ‘लाखात एक आमचा दादा’मधील तुळजा व पारू देत कौतुक करतात.
लीलाचा हा खास उखाणा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच तिचा हा उखाणा नेटकऱ्यांच्याही चांगलाच पसंतीस पडला आहे. “क्या बात है”, “खूपच छान”, “भारी”, “मस्तच”, खूप छान उखाणा” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, मालिकेत नुकतंच लीलाच्या मित्राची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता या नवीन मित्राच्या एन्ट्रीने दोघांच्या नात्यावर काय परिणाम होणार? हे लवकरच पाहायला मिळेल.