लग्न म्हटलं की या यातील मुख्य विधी असतो, तो म्हणजे ‘केळवण’. लग्नाच्या आधी नातेवाईक व मित्र परिवाराकडून नव दाम्पत्यासाठी केळवणाचे आयोजन केले जाते. नुकतेच असेच एक केळवण पार पडले असून या केळवणाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या आपल्या लाडक्या जोड्या म्हणजेच एजे-लीला, आकाश-वसुंधरा, आशु-शिवा आणि पारू-आदित्य या जोड्या आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आता मालिकांमध्ये लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. दरम्यान, नुकताच या जोड्यांचा केळवण सोहळा पार पडला.
या केळवण सोहळ्यात प्रत्येकाने आपल्या जोडीदारासाठी खास उखाणा घेतला. यावेळी लीलाने एजेसाठी घेतलेल्या खास उखाण्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मालिकेत सध्या एजे व लीला यांच्यात लग्न होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच या केळवणात लीलाने एजेसाठी उखाणा घेतला आहे. लीलाने एजेच्या नावाचा उल्लेख करत खास उखाणा घेतला.
यावेळी ती असं म्हणाली की, “बनायचं होतं हिरोईन आणि शाहरुख व सलमानबरोबर करायचं होतं काम, पण नशिबाने अशी पलटी मारली की, पदरात पडला अभिराम”. तिच्या या उखाण्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या जयघोषात तिचे कौतुक केले. यानंतर अभिराम म्हणजेच एजेनेही उपस्थित स्त्रियांच्या मदतीने लीलासाठी उखाणा घेतला. अभिरामने लीलासाठी खास उखाणा घेत असं म्हटलं की, “चांदीच्या परातीला सोन्याची करी, लीला दिसते बरी, पण माझ्या कुटुंबाला सांभाळेल तेव्हा खरी”. एजेच्या या उखाण्यावरही उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्याच्या उखण्याचे कौतुक केले.
आणखी वाचा – देवीआईच्या लेकींच्या हाती पाचवी पेटी, पेटीमध्ये विरोचकाला मारण्याचे ‘ते’ शस्त्र, अखेर रुपालीचा अंत होणार
दरम्यान, आता छोट्या पडद्यावरील या लाडक्या जोड्यांच्या आयुष्यात अनेक ट्विस्टदेखील येणार आहेत. एकीकडे अभिरामचं लग्न श्वेताशी होतानाचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, वसू-आकाशच्या लग्नात एक मोठं सत्य लपवलं गेलं आहे. आशु-शिवाबरोबरच पारू-आदित्य जोडीमध्येदेखील काही क्लेश निर्माण होणार आहेत. त्यामुळे मालिकांमधील हे रंजक वळण आता येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.