नागराज मंजुळे हे नाव आपण ऐकलं की, फँड्री, सैराट, झुंड, नाळ यांसारखे अनेक चित्रपट आपल्या डोळ्यासमोर येतात. अशातच, ‘नाळ’च्या अभुतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे झी स्टुडिओजसह ‘नाळ’चा सिक्वेल घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलाच उतरला होता. त्याचबरोबर या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. चित्रपटाची कथा, लहानग्याचे भावविश्व, ग्रामीण बाज, श्रवणीय गाणी, छायाचित्रण व अप्रतिम दिग्दर्शन प्रेक्षकांना प्रचंड भावली. इतकेच नव्हे, तर ‘आई मला खेळायला जायचंय’ या गाण्याने प्रेक्षकांवर वेगळी जादूच केली होती. त्यामुळे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंटी प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘चैत्या’च्या त्या निरागस भावविश्वात नेण्यासाठी सज्ज झाले आहेत. (Naal 2 Teaser)
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर, आज याचं टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. समोर आलेल्या या टीझरमध्ये पहिल्या भागाची एक छोटीशी झलक दाखवण्यात आली. “आता मी येतच नै”, अश्या निरागस आवाजात हा डायलॉग म्हणत चैत्या त्याच्या खऱ्या आईला शोधायला निघतो. टीझरच्या शेवटी चैत्या बसमधून प्रवास करताना दिसत असून दुसऱ्या भागात प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार, याबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा – “तुझ्या मिठीत…”, पाठकबाईंची नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त रोमँटिक पोस्ट, म्हणाली, “माझ्या आयुष्यातील…”
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंटी म्हणाले, “माझ्या पहिल्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आई-मुलाच्या नात्यातील खूप साधी अशी ही गोष्ट आता पुढे जाणार असून ‘नाळ भाग २’ प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, अशी आशा आहे. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव खूपच अनोखा होता आणि आताही आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता या सगळ्याच भूमिकेत नागराज मंजुळे अव्वल आहेत आणि झी स्टुडिओजबद्दल सांगायचे तर त्यांनी आजपर्यंत मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. या दोघांबरोबर आता माझीही ‘नाळ’ जोडली गेली आहे. चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झालं आहे आणि चैत्या त्याच्या खऱ्या आईकडे निघाला आहे, त्यामुळे चैत्याचा हा प्रवास त्याला कुठे नेणार, याचे उत्तर लवकरच तुम्हाला चित्रपटगृहात मिळणार आहे.”
हे देखील वाचा – सेटवर दोन तास रिकाम्या मिळालेल्या वेळेमध्ये जुई गडकरी काय करते?, स्वतःच व्हिडीओ शेअर करत केला खुलासा
‘नाळ’च्या पहिल्या भागात बालकलाकार श्रीनिवास पोकळे, देविका दफ्तरदार आणि नागराज मंजुळे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार, चित्रपटातील गाणी कशी असणार, याची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे. येत्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी अधिकच धमाकेदार असणार आहे, हे मात्र नक्की.