मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही त्यांच्या क्षेत्रात काम करण्याबरोबरच आजूबाजूच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवरही भाष्य करत असतात, अशा काही कलाकारांपैकी एक अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो नेहमीच त्याच्या राजकीय व सामाजिक भूमिका मांडत असतो. याआधी त्याने अनेकदा त्याच्या राजकीय व सामाजिक भूमिका सोशल मीडिया किंवा मुलाखतीच्या मध्यायातून व्यक्त केल्या आहेत. घाटकोपर होर्डींग दुर्घटना असो किंवा गोरेगावमधील कचऱ्याची समस्या असो. शशांकने त्याच्या सोशल मीडियाद्वारे याबद्दल कायमच त्याच्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत.
अशातच शशांकने नुकताच ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधला. यावेळी त्याला तो सोशल मीडियावर मांडत असलेल्या त्याच्या राजकीय व सामाजिक भूमिकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं हा एक नागरीक म्हणून माझा अधिकार आहे आणि मी खऱ्या आयुष्यात कसा आहे हे लोकांना कळावं असं त्याने म्हटलं. तसेच यापुढे त्याने देशाची परिस्थिती बघून माझं रक्त खवळतं अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली.
याबद्दल त्याने पुढे असं म्हटलं की, “आपण सतत घाबरत असतो. आपल्या देशातील पोलिस, देव, डॉक्टर व राजकीय नेत्यांची आपल्याला भीती आहे आणि या भीतीतून बाहेर यायला हवं. आपण या भीतीतून बाहेर पडलं पाहिजे. आपण या समाजाचा एक भाग आहोत. आपण आपल्या समाजाचं देणं लागतो तर आपण आपल्या समाजाबद्दल चांगला विचार करणे गरजेचे आहे”.
आणखी वाचा – Video : आजोबांना टीव्हीवर बघून नातू खुश, अरुण कदमांच्या पत्नीने शेअर केला नातवाचा गोड व्हिडीओ
यापुढे शशांकने राजकीय नेत्यांना उद्देशून असं म्हटलं की, “आताची पिढी त्यांच्या करिअरबद्दल जितका विचार करते तितकाच स्वच्छतेचा, संस्काराचा व नियमांचाही विचार करते. आताच्या पिढीला धर्म, जात यात अडकवून ठेवू नका. कारण आम्हाला आता वेगळ्या देशाची अपेक्षा आहे. ते दिवस गेले. त्यामुळे आता ते सोडून द्या, तुम्हीही मोठे व्हा आणि या सगळ्यात आम्हाला अडकवून ठेवू नका. कारण माणसापलीकडे काहीही नसतं”.
दरम्यान, शशांक केतकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे तो जितका चर्चेत राहत असतो. तितकाच तो सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त करत चर्चेत राहत असतो.