क्रिकेट विश्वातील सर्वांचा आवडता हंगाम म्हणजे आयपीएलचा हंगाम. अनेक क्रिकेटप्रेमी क्रिकेटच्या या आयपीएल हंगामासाठी आतुर असतात. अशातच नुकतीच ‘आयपीएल २०२४’ सुरु झाली असून यंदाच्या आयपीएल हंगामाबद्दल अनेक चर्चा होताना दिसून येत आहे. यात मुख्यत्वे हार्दिक पांड्या व रोहित शर्मा यांच्या नावाच्या चर्चांनी तर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
‘मुंबई इंडियन्स’ने रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून आयपीएलच्या यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले आहे. मात्र हार्दिकच्या कर्णधारपदाने संघातील वातावरण पूर्वीसारखे खेळीमेळीचे राहिले नसल्याचे दिसून येत आहे. त्याची रणनीती सपशेल अपयशी ठरत आहे. ‘मुंबई इंडियन्स’ने आतापर्यंत झालेले सलग दोन्ही सामने गमावले आहेत. विशेषत: माजी कर्णधार रोहित शर्माबरोबरचे त्याचे संबंध अजिबात सौहार्दपूर्वक नसून एकाच संघात गटबाजी दिसून येत आहे.
‘मुंबई इंडियन्स’ने कर्णधार पदावरून रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्यामुळे दोन्ही खेळाडूंमधील संबंध खराब झाले असल्याच्या चर्चा रंगत आहेत. जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांच्यासह काही खेळाडू आता रोहित शर्माच्या बाजूने आहेत, तर हार्दिक पांड्याला इशान किशनसह संघ मालकांचा खुला पाठिंबा आहे. त्याच प्रमाणे कोचिंग स्टाफही विभागलेला दिसत आहे. हार्दिक पांड्याचे किरॉन पोलार्डबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध हे जगजाहीर आहेत.
त्यामुळे संघमालक अंबानी कुटुंबाकडून हार्दिकला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे हार्दिककडून खेळात निष्काळजीपणा होत आहे आणि याचे परिणाम संघाला भोगावे लगात आहेत. उदाहरणार्थ, पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहसारख्या वरिष्ठ गोलंदाजाला गोलंदाजी देण्याऐवजी तो स्वत: गोलंदाजी करताना दिसला. तसेच दुसऱ्या सामन्यात त्याने १७ वर्षांच्या अनुभव नसलेल्या व नवोदित माफाकाला संधी दिली. पांड्याच्या याच वृत्तीमुळे ‘मुंबई इंडियन्स’ सामने हरत असल्याची टीका केली जात आहे.