रविवार, २४ मार्च २०२४ रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान मैदानात एक कुत्रा आला होता. यावेळी कुत्र्याला मैदानातून हाकलवण्यासाठी अनेक लोक त्याचा पाठलाग करत होते. यावेळी काही लोकांनी त्या कुत्र्यांवर हल्ला केला. ‘स्ट्रीट डॉग्स ऑफ बॉम्बे’ च्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात आयपीएलमधील सुरक्षा व ग्राउंडच्या कर्मचाऱ्यांकडून कुत्र्यावर हल्ला होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कुत्र्याबाबत झालेल्या या वागणुकीवर अनेकांनी आपला निषेध व्यक्त केला आहे. यावर अभिनेता वरुण धवनने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वरुणने या व्हिडीओद्वारे स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांवर टीका करत असं म्हटलं आहे की, “हा काय मूर्खपणा आहे? कुत्रा हा काही फुटबॉल नाही. जर कुत्रा कोणाला चावत नाही, किंवा कोणतीही इजा करत नाही. तर त्याला बाहेर काढण्यासाठी आणखी चांगला मार्ग नव्हता का?”
अशातच आता मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेनेही तिच्या सोशल मीडियाद्वारे या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर “लाईव्ह कॅमेरा हे कधीही टीव्हीवर दाखवणार नाही असं लिहिलं आहे. तसेच या व्हिडीओद्वारे “आपण माणूस म्हणून अपयशी ठरत आहोत का?” असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. याच व्हिडीओवर अभिज्ञाने तिची भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “हे प्रत्यक्षात घडले यावर विश्वास बसत नाही”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाण्यात मुक्या प्राण्यांच्या ग्रूमिंग सेशन सेंटरमध्ये कर्मचाऱ्याने एका श्वानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. हा धक्कादायक प्रकार समोर येताच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आशातच आता हाअ व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण यावर टीका, नाराजी, दु:ख त्याचबरोबर निषेध व्यक्त करत आहेत.