गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांनी आपल्या नात्याची कबुली देत चाहत्यांसह गुडन्यूज शेअर केली आहे. तसेच अनेक कलाकारांनी त्यांची लग्न ही उरकली आहेत. अशातच ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी देखील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली दिली. ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांसह गुडन्यूज शेअर केली. आता हे जोडपं लग्नबंधनात कधी अडकणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. (Mugdha Vaishampayan On Her Sister)
लग्नाआधी हे जोडपं केळवणाचा आनंद लुटताना दिसत आहेत. मुग्धा व प्रथमेश या दोघांनीही त्यांच्या केळवणाचे अनेक फोटोस सोशल मीडियावरून शेअर देखील केले होते. मुग्धाने तिच्या आजोळी पारंपारिक पद्धतीने पार पडलेल्या केळवणाचे अनेक फोटोस शेअर देखील केले होते. प्रथमेश व मुग्धा यांच्या लग्नापुर्वीच्या पारंपारिक रितीरिवाजांची सुरूवात झाल्यानंतर काही दिवसांनी प्रथमेशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत त्याच्या पहिल्या केळवणाची झलक दाखवली. मुग्धाने तिच्या लग्नाच्या बातमीसह आणखी एक आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे.
मुग्धाने नुकताच एक केळवणाचा आनंद लुटल्यानंतरचा कुटुंबाबरोबरचा फोटो स्टोरीला पोस्ट केला आहे. या फोटोसह तिने कॅप्शन देत म्हटलं आहे की, “ये तस्वीर है, ख्वाबो के रंगो की, खुशियो की, सभी अपनो की” असं म्हणत, तिने लिहिलंय, “तळटीप : प्रिय, लाडके, देवानंद काका, तुम्ही आम्हाला सोडून जाऊन ३ वर्ष झाली. असा एकही दिवस जात नाही की तुमची आठवण येत नाही. आज माझं आणि ताईचं केळवण होत खानाव ला. तुम्हाला अशक्य मिस केलं.” असं कॅप्शन दिल आहे. यावरून असं कळतंय की, मुग्धासह तिच्या बहिणीचंही लग्न जुळलं आहे. मुग्धा व तिच्या बहिणीचा एकत्र केळवणाचा कार्यक्रम पार पडला असल्याची माहिती मुग्धाने सोशल मीडियावरून दिली आहे.

याआधीही जेव्हा मुग्धाचं तिच्या पुण्यातील घरी म्हणजेच आजोळी पारंपारिक पद्धतीने केळवण झालं होत तेव्हा तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये मुग्धासह तिची बहीणही पाहायला मिळाली होती. मात्र त्यावेळी खरंच तिची बहीण लग्नबंधनात अडकणार का, हे स्पष्ट झालेलं नव्हतं. आता मात्र स्वतः मुग्धाने स्टोरी पोस्ट करत तिच्या बहिणीचंही लग्न होणार असल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली.