झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमाची लोकप्रियता ही सर्वश्रुत आहे. याच कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेली गायिका म्हणून कार्तिकी गायकवाडला ओळखले जाते. या कार्यक्रमाची विजेती गायिका कार्तिकी ही तिच्या आवाजाने कायमच चर्चेत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत असते. आपल्या आवाजाने कायमच चर्चेत राहणारी कार्तिकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कार्तिकी ही लवकरच आई होणार असून तिने तिच्या ओटीभरणाच्या खास कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. पारंपरिक पद्धतीनं कार्तिकीचं डोहाळ जेवण करण्यात आले. या डोहाळे जेवणाचे काही खास फोटो तिने नुकतेच तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कार्तिकीचे आई-वडील, सासू-सासरे व तिचे दोन भाऊ दिसत आहेत. “ओटीभरण कार्यक्रमातील काही खास क्षण” असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
कार्तिकी आई होणार असल्याची खुशखबर समोर येताच चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गायिका प्रियंका बर्वे, शरयू दाते, शमिका भिडे, मालविका दीक्षित यांच्यासह अभिनेत्री अनुष्का सरकटे व प्राजक्ता गायकवाड यांनीही कमेंट्सद्वारे कार्तिकीचे कौतुक केले आहे. तसेच कार्तिकीची मैत्रीण व गायिका मुग्धा वैशंपायननेदेखील “खूप खूप आनंदी आहे” असं म्हणत कार्तिकीला अभिनंदन म्हणत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकीचा मोठा चाहतावर्ग आहे. कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’मधील कार्तिकीचं ‘घागर घेऊन’ हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. कार्तिकी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अशातच तिने शेअर केलेले हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.