लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी देण्यात येणाऱ्या मृदगंध पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. येत्या २६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिलीप प्रभावळकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष व गायक नंदेश विठ्ठल उमप यांनी दिली आहे. (Mrudgandh Lifetime Achievement Award announced)
‘विठ्ठल उमप फाऊंडेशन’तर्फे दरवर्षी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना हा मनाचा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. या पुरस्काराचे हे यंदा १३ वे वर्ष आहे. नुकतंच पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष नंदेश विठ्ठल उमप यांनी या पुरस्कारांच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, प्रसिद्ध गायक सुदेश भोसले (संगीत), आतांबर शिरढोणकर (लोकसंगीत), अभिनेता सुमित राघवन व चिन्मयी सुमित (अभिनय) आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर (नवोन्मेष) यांना यंदाच्या मृदगंध पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
हे देखील वाचा – “सहा वर्षांनी गरोदर राहिले आणि…”, मुल झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये होती नम्रता संभेराव, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “ढसाढसा रडले अन्…”
येत्या २६ नोव्हेंबरला ठाण्यात हा पुरस्कार सोहळा रंगणार असून या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे, उदय सामंत, आशिष शेलार व अन्य मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी नंदेश उमप यांनी याबद्दल माहिती देताना म्हणाले, “लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेसाठी आपलं आयुष्य वेचलं. जेव्हा ते रंगमंचावर उभे राहायचे, तेव्हा एक चैतन्य संचारायचं. याच चैतन्याचा शोध घेत विविध क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करणे, हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
हे देखील वाचा – “नोकरी मागणारा नाही तर…”, नितीन गडकरींच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन तेजस्विनी पंडितचं वक्तव्य, म्हणाली, “मराठी माणूस…”

दरम्यान, या सोहळ्यानंतर गायक-संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा विशेष कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच, शाहीर बापू जाधव यांच्या लोककला शाहिरीचा आणि खुशाबा यांच्या आदिवासी नृत्याचा कार्यक्रमदेखील या सोहळ्यात पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेला नंदेश उमप, सरिता उमप व उदेश उमप आदी उपस्थित होते.