छोट्या पडद्यावर सासू-सूनांच्या जोड्या नेहमीच चर्चेत असतात. त्याचबरोबरीने खऱ्या आयुष्यातील सासू-सूनांच्या जोडीवरही चाहते भरभरुन प्रेम करतात. सिनेसृष्टीतील अशीच एक चर्चेत व लोकप्रिय असलेली जोडी म्हणजे शिवानी रांगोळे व मृणाल कुलकर्णी. शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं आहे. गेली काही वर्ष शिवानी व विराजस यांच्यात मैत्रीपूर्व नातं होतं. कालांतराने त्यांच्यातील या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आणि या दोघांनी लगीनगाठ बांधली. शिवानीचं तिची सासू अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यावरही प्रचंड प्रेम आहे. (Shivani Rangole Birthday)
कुलकर्णी कुटुंबात सून म्हणून येण्यापूर्वीच शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची लाडकी होती. शिवानीच्या कामाचंही मृणाल कायमच भरभरून कौतुक करताना दिसतात. अनेक कार्यक्रमांना या दोघी एकत्र हजेरी लावताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाद्वारे दोघीही एकमेकींवरचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. आज शिवानीच्या वाढदिवसानिमित्त मृणाल यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मृणाल यांनी शिवानीचा एक फोटो शेअर करत म्हटलं की, “सूनबाई, कम सून. प्रिय शिवानी, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. गेले २-३ महिने अविरत कष्ट करत आहेस. तेही हसतमुखाने, न दमता न कंटाळता. ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ मालिकेतली अक्षरा उर्फ मास्तरीन बाई म्हणून अमाप लोकप्रिय झाली आहेस. आम्हाला तुझ्या यशाचा खूप आनंद आहे. अभिमान आहे. अशीच यशस्वी हो. तुझी सारी स्वप्नं पूर्ण होऊ दे. आनंदी राहा. खूप खूप प्रेम. (ता. क. – पण सून, come soon g ! Miss you! तुझे लाड कधी करायचे आम्ही?)”.
सध्या शिवानी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. तिच्या या मालिकेतील भूमिकेचंही सर्वत्र कौतुक केलं जात आहे. सध्या या मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त शिवानी घरापासून दूर राहत आहे. त्यामुळे लवकर घरी ये असा मॅसेज देणारी पोस्ट तिच्या सासूबाई मृणाल यांनी शेअर केली आहे. शिवाय सोशल मीडियाद्वारेही शिवानीला चाहते वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा देत आहेत.