हिंदी सिनेविश्वातून मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीबाबत एक मोठी अपडेट आली. दरम्यान, त्यांच्या तब्येतीबाबत आलेल्या अपडेटमुळे चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण पाहायला मिळालं. मिथुन चक्रवर्ती यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली. उपचारादरम्यान असं समोर आलं की, त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला असून आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Mithun Chakraborty Health Update)
यानंतर रविवारी हॉस्पिटलमधून त्यांचा पहिला व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये मिथुन चक्रवर्ती डॉक्टरांशी बोलताना दिसले. पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख सुकांत मजुमदार व माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली त्यांना भेटायला आले होते. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मिथुन हॉस्पिटलच्या बेडवर बसलेले दिसत आहेत. यावेळी डॉक्टर त्यांना असे सांगताना दिसत आहेत की, “आता ठीक आहे, सलाईन चालू आहे, तुम्ही पुरेसे पाणीही पीत आहात, त्याकडे दुर्लक्ष करू नका”. यानंतर मिथुन डॉक्टरांच्या पायाकडे बोट दाखवून काहीतरी बोलताना दिसत आहेत.
#WATCH | West Bengal BJP chief Sukanta Majumdar met veteran actor and BJP leader Mithun Chakraborty at a private hospital in Kolkata pic.twitter.com/4FRNoTuwKb
— ANI (@ANI) February 11, 2024
‘एएनआय’ने हा व्हिडीओ शेअर करत असे लिहिले आहे की, “पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख सुकांत मजुमदार यांनी ज्येष्ठ अभिनेते व भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांची कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात भेट घेतली”. तत्पूर्वी, रुग्णालयाने एक निवेदन जारी करून ते पूर्णपणे शुद्धीत असल्याचे देखील सांगितले होते. हॉस्पिटलच्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांना ब्रेन इस्केमिक सेरेब्रोव्हस्कुलर अपघात (स्ट्रोक) झाला होता. जेव्हा त्यांना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांनी उजव्या बाजूच्या वरच्या बाजूला अशक्तपणा आल्याची तक्रार केली. त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
मिथुन यांनी दिग्दर्शक मृणाल सेरिकी यांच्या ‘मृगया’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याच्या प्रमुख चित्रपटांमध्ये ‘डिस्को डान्सर’, ‘अग्निपथ’, ‘घर एक मंदिर’, ‘जल्लाद’ आणि ‘प्यार झुकता नहीं’ या चित्रपटांचा समावेश आहे.