अभिनेत्री मिताली मयेकरने मराठी सिनेसृष्टीत छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. तिने अभिनयातून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. मिताली सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमी विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर वेगळा असा चाहतावर्ग आहे. तिने केलेल्या पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. आज मितालीचा वाढदिवस आहे. मिताली व सिध्दार्थ चांदेकर तिच्या वाढदिवसानिमित्त दोघेही दुबईत फिरायला गेले आहेत. दरम्यान तिला सोशल मीडियावर बऱ्याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या तिने शेअर केलेली एक पोस्ट बरीच चर्चेत आहे. ती विशेष पोस्ट म्हणजे मितालीला तिच्या वडिलांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा. तिच्या वडिलांनी तिला खास मेसेज करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आपल्या लेकीच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांनी लेकीच बरंच कौतूक केलं आहे. (Mitali mayekar’s father send birthday massage to mitali)
मितालीच्या वडिलांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी लिहीलं की, “२७ वर्षांपूर्वी साधारण या वेळेला आम्हाला कळलं होतं की, उद्या दुपारपर्यंत आमचा बाबू आमच्या हातात असेल. कोण असेल, कसा असेल ह्याचं प्रचंड टेन्शन होतं. पण जे काही असेल कसंही असेल पण आपले बाळ असेल ह्यातच सगळा आनंद होता. पण आम्हाला दोघांनाही जे मनापासून हवं होतं तेच परमेश्वराने आम्हाला दिलं. सकाळी विषय झाला तेव्हा आई म्हणाली, २७ वर्षांपूर्वी पोटातलं जग बघत होती आता सगळ्या जगभर फिरतेय! असाच खूप खूप मोठा हो! यशस्वी हो! उद्या तुझा २७वा वाढदिवस दिवस कसे भुर्रकन उडून गेले कळलंच नाही. तुझ्याशी बोबडं बोलळ्याची सवय अजूनही गेली नाही आमची तुझ्या लहानपणीच्या आठवणी आल्या नाहीत असा एकही दिवस जात नाही. मग तुझे ते बोबडे बोल आम्हीच एकमेकांशी बोलतो. तू मोठी झालीस पण आम्ही अजूनही त्याच जगात वावरतोय. कारण तू आमच्यासाठी अजूनही तीच आहेस तशीच आहेस. छकुली! वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा पिल्लू! आणि खूप खूप खूप प्रेम व आशीर्वाद!”, या पोस्टवरून मितालीच्या वडिलांचं मितालीवरील प्रेम दिसून येत आहे.
आणखी वाचा – किंग खान शाहरुखच्या ‘जवान’चा बॉक्स ऑफिसवर डंका; चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी
वडिलांनी दिलेल्या या शुभेच्छांचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. “माझ्या बाबांनी पाठवलेल्या या मेसेजमुळे माझा संपूर्ण दिवस आनंदी झाला”, असं लिहीत पोस्ट केली आहे. वाढदिवसानिमित्त मिताली व सिध्दार्थ चांदेकर सध्या दुबईत फिरायला गेले आहेत. तिथले बरेच फोटो मितालीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नेटकरीदेखील त्यांच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.