मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. सोशल मीडियावर रिल्स शेअर करत ही जोडी चाहत्यांच्या संपर्कात असते. अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना मिताली खऱ्या आयुष्यातही हसत खेळत राहते. आज मितालीचा २७वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त कलाकारांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सिद्धार्थनेसुद्धा बायकोसाठी खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.(Siddharth’s special post on Mithali’s birthday)
सिद्धार्थने मितालीला शुभेच्छा देण्यासाठी पॅरिसमधील रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. या पोस्टद्वारे त्याने म्हटलं की, “Happy Birthday बाळा! तुझ्या गोड स्वभावामुळे मला नेहमीच तुझा अभिमान वाटतो. माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमीच तुला खूप प्रेम”. सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करत मितालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थने वाढदिवसाचं खास गिफ्टही तिला दिलं. त्याने तिला शूज गिफ्ट केले आहेत. इन्स्टाग्रामद्वारे स्टोरी शेअर करत ती म्हणाली, “Birthday kicks. Thank you Navara”.
२०२१मध्ये सिद्धार्थ-मिताली विवाहबंधनात अडकले. पुण्यात अतिशय पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. लग्न झाल्यापासून सिद्धार्थ-मितालीने काही परदेश दौरेही केले. मितालीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघेही दुबईला गेले आहेत. दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर दुबईतील काही फोटो शेअर केले आहेत. दोघंही त्यांच्या सुखी संसारामध्ये रमले आहेत.
नुकतंच मितालीच्या सासूबाईंचं दुसरं लग्न झाल्याचे फोटो चर्चेत होते. या त्यांच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं. लग्नानंतर मिताली तिच्या सर्व जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडताना दिसत आहे.