बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या व्यावसायिक व खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. २०२१ साली त्याने दुसरी पत्नी किरण रावबरोबर घटस्फोट घेतला. पण त्यानंतर दोघेही मुलगी आयरा खान व नूपुर शिखरे यांच्या लग्नामध्ये एकत्रितपणे दिसून आले होते. त्यानंतर किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या निमित्तानेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. आज पुन्हा एकदा आमिरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र दिसले आहेत. त्याच्या वाढदिवसाचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (aamir khan birthday)
आमिरचा जन्म १४ मार्च १९६५ साली मुंबईमध्ये झाला. १९७३ साली त्याने बालकलाकार म्हणून ‘यादो की बारात’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘अंदाज अपना अपना’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल चाहता है’, ‘जो जिता वही सिकंदर’, ‘लगान’, ‘थ्री इडियट्स’, ‘तारे जमीन पर’ असे अनेक चित्रपट केले आहेत. या सर्व चित्रपटातील सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.आता त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किरण राव पुन्हा एकदा एकत्र असल्याचे पाहिले गेले. वाढदिवसानिमित्त त्याने सांताक्रुज येथील ऑफिसच्या बाहेर किरणबरोबर येऊन मध्यमांबरोबर केक कापून आनंद साजरा केला.
या प्रसंगी आमिर, किरण यांच्याबरोबर त्याच्या प्रोडक्शनमध्ये निर्मित झालेली ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील कलाकारही हजर होते. यामध्ये नितांशी गोयल,प्रतिभा रांटा व स्पर्श श्रीवास्तव हे उपस्थित होते. आमिरने काळ्या रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅंट घातली होती. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर पूर्वाश्रमीची पत्नी किरणने आमिरला केक भरवला. त्यानंतर आमिरने उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले आणि म्हणाला, “मला जर कोणाला काही भेटवस्तू द्यायची असेल तर त्यांनी ‘लापता लेडीज’ हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहा. माझ्यासाठी हीच भेटवस्तू असेल”.
तसेच किरणने देखील ‘लापता लेडीज’ चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दर्शकांचे आभार व्यक्त केले. आमिरच्या वाढदिवसाचे फोटो व व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. २०२४ साली आमिरचा ‘सितारे जमीन पर’ चित्रपट येणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये होत आहेत.