दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आकस्मिक निधनाने त्याच्या चाहत्यांसह साऱ्यांनाच धक्का बसला. सुशांतच्या निधनाला आता चार वर्ष पूर्ण होतील. मात्र त्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास अद्याप अपूर्ण असल्याचे सांगण्यात येते. १४ जून २०२० रोजी सुशांतनं त्याच्या मुंबईतील राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु आहे. मात्र त्याला तीन वर्षे होऊनही त्याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
यावर आता अभिनेत्याच्या बहिणीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे. दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संपर्क साधला आहे आणि आपल्या भावाच्या मृत्यूच्या तपासाबाबत केंद्रीय अन्वेषण ब्यूरोला (CBI) गती देण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. कीर्तीने सोशल मीडियावर एक भावुक व्हिडीओ शेअर करत यंत्रणेकडून जवळपास ४५ महीने होऊनही काहीही निष्पन्न झाले नसल्यामुळे तपासाच्या अकार्यक्षमतेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
या व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “माझा भाऊ सुशांत सिंह राजपूतला जाऊन जवळपास ४५ महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र अजूनही तपास यंत्रणेकडून सुरु असलेल्या चौकशीबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही. त्यामुळे मी माननीय पंतप्रधान मोदींनी या प्रकरणात लक्ष देण्याची विनंती करत आहे. तुम्ही याकडे लक्ष दिलंत तर आम्हाला आमच्या भावाच्या मृत्यूचा तपास नेमका कुठपर्यंत आला आहे याबद्दल नेमकी माहिती मिळू शकेल. तसेच सर्वसामान्यांचा तपास यंत्रणेवरील असलेला विश्वास यामुळे सार्थ होईल. या प्रकरणात आमच्या संपूर्ण कुटुंबासह अनेक देशवासीयांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला या प्रकरणात जातीने लक्ष देण्याची विनंती करत आहे”.
दरम्यान, सुशांतच्या बहिणीने भावाच्या मृत्यूच्या दीर्घ अनिश्चिततेबद्दल तिचं रोष व्यक्त केला असून सीबीआयने त्यांच्या तपासात संवेदनशीलता व पारदर्शकता दाखवावी, असे आवाहनही केले आहे आणि यासाठी तिने थेट नरेंद्र मोदींनाच गाऱ्हाणे घातले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणते नवीन मिळणार/ यातून काय निष्पन्न होणार? याची त्याच्या अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.