मराठी कलाविश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री मेघना एरंडे हिला पितृशोक झाला आहे. मेघना एरंडे हिचे वडील सुधीर एरंडे यांचे काल संध्याकाळी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यात निधन झाले आहे. मेघनाने स्वत: एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
मेघनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिच्या वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो शेअर करत तिने एक पोस्टही लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “मी अत्यंत जड अंतःकरणाने तुम्हा सर्वांना कळवू इच्छिते की, माझे वडील सुधीर एरंडे यांचे २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पुण्यात निधन झाले.” यापुढे तिने तिच्या बाबांबद्दलच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “माझे बाबा खरोखरच एक रत्न होते. ते एक अतिशय प्रेमळ व्यक्ती होते. तुझी खूप आठवण येईल बाबा. ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो! ओम शांती”.
आणखी वाचा – अभिमानास्पद! महेश काळे यांच्या पत्नीची ‘ऑस्कर’पर्यंत झेप, पोस्ट शेअर करत म्हणाले “जिद्द, मेहनत अन्…”
मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्रीसह एक उत्तम डबिंग आर्टिस्ट म्हणूनही मेघना एरंडेला ओळखले जाते. मेघना एरंडेने हॅरी पॉटरच्या सीरिजपासून अगदी निंजा हातोडी, नॉडी यांसारख्या अनेक कार्टुनच्या पात्रांना आवाज दिला आहे. फार कमी वयात मेघनाने कलाविश्वात पदार्पण केलं आणि सिनेक्षेत्रात तिचे स्थान निर्माण केलं आहे आणि या साऱ्यात तिला तिच्या वडिलांचा खूपच मोठा आधार होता. अशातच तिचे पितृछत्र हरवल्यामुळे ती कोलमडून गेली आहे.
दरम्यान, मेघनाच्या या पोस्टखाली अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत मेघनाच्या वडिलांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच अनेकांनी कमेंट्स करत त्यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे.