मराठी सिनेसृष्टीतील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनाली कुलकर्णी. लाडकी अप्सरा म्हणून सोनालीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांवर आपलं अधिराज्य गाजवलं आहे. निरागस अभिनय, उत्तम नृत्यकौशल्य व सौंदर्याने सोनालीने मराठीसह हिंदी प्रेक्षकांनादेखील भुरळ घातली आहे. आपल्या विविधांगी भूमिकांसाठी लोकप्रिय असलेली सोनाली तिच्या रोखठोक भूमिकांसाठीही तितकीच प्रसिद्ध आहे. अशातच नुकतीच तिने सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक विषयांवर आपली मते मांडली.
नुकत्याच एका हिंदी पुरस्कार सोहळ्यात ऑरी अर्थात ओराहन अवत्रामणीला अगदी पुढे स्थान देण्यात आले होते. याउलट अभिनेता विक्रांत मेस्सीला मागे बसवण्यात आले होते. यावरून सोनालीला ऑरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत ती असं म्हणाली की, “हे अजिबातच मान्य नाही. मला वाटतं की याबद्दल प्रत्येकाने विचार केला पाहिजे. हल्ली मराठी पुरस्कार सोहळ्यातदेखील हे घडताना पाहायला मिळत आहे. आपण हे फक्त ऑरी किंवा विक्रांत बद्दल बोलणे सोडून देऊ. पण मला वाटतं जे मराठी किंवा हिंदी सिनेसृष्टीत अनेक महान कलाकार आहेत, जे त्यांचा चित्रपट असो वा नसो पण प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहतात, त्यांना आदरपूर्वक पहिल्या रांगेत बसण्याचा मान दिला पाहिजे”.
यापुढे ती असं म्हणाली की, “मला वाटतं चित्रपटांसाठी पुरस्कार असेल तर त्यासंबंधित मान्यवर लोकांना आपण सर्वप्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. मला माहीत नाही चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ऑरी काय करत आहे? भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रमोशन करण्यासाठी आपल्याला ऑरीची गरज आहे का? चित्रपट सृष्टी अशीही मोठीच आहे, तर आपल्याला प्रमोशन करण्यासाठी सोशल इन्फ्लुएन्सर्सची गरज का भासावी? भारतीय चित्रपट सृष्टीत त्यांचं नेमकं योगदान काय आहे?”
आणखी वाचा – अभिमानास्पद! महेश काळे यांच्या पत्नीची ‘ऑस्कर’पर्यंत झेप, पोस्ट शेअर करत म्हणाले “जिद्द, मेहनत अन्…”
यापुढेही सोनालीने आपले एक खंत व्यक्त करत असं म्हटलं की, “मी खूप ठिकाणी असंही पहिले आहे की, जीवन गौरव पुरस्कार देणाऱ्या व्यक्तीलादेखील पहिल्या रांगेत बसवले जात नाही आणि हे फार दु:खद आहे. जेव्हा मी माझ्या काही वरिष्ठांना माझ्यापेक्षा मागे बसलेले पाहते, तर मी उठून स्टेजच्या मागे जाते”. दरम्यान, पुरस्कार सोहळ्यांमध्ये अनेक दिग्गज व मान्यवर कलाकारांचा अधिक मानसन्मान न करता सोशल इन्फ्लुएन्सर्सना अधिक प्राधान्य दिले जाते, यावर आपले मत परखडपणे मांडले आहे.