भारतात शास्त्रीय संगीतातील एक मोठं व लोकप्रिय नाव म्हणजे गायक महेश काळे. आपल्या गायनाच्या अनोख्या बाजाने आजच्या तरुणाईला भारतीय शास्त्रीय संगीताकडे वळवण्याचे श्रेय महेश काळे यांना जाते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महेश काळे यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. महेश काळे हे एक उत्तम गायक असण्याबरोबरच एक उत्तम परिक्षकदेखील आहेत. दरम्यान, महेश काळे हे संगीत क्षेत्रातील एक मोठं नाव आहे हे आपण जाणतोच. पण त्यांची पत्नी पूर्वा गुजर-काळे यासुद्धा संगीत क्षेत्राशी संबंधित आहे.
पूर्वा गुजर-काळे यांनी नुकतीच संगीत क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पदवी संपादन केली असून यासंबंधित महेश काळेंनी सोशल मीडियावर एक पत्नीसाठी खास पोस्ट शेअर करत तिचे अभिनंदन केले आहे. महेश काळे यांनी आपल्या पत्नीचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “चेहऱ्यावर सौम्य स्मित असलेली एक सुंदर महिला जी खूप जिद्दी, मेहनती व हुशार आहे. गेल्या वर्षी डॉल्बी लॅबसाठी काम करत असताना तिने पाश्चात्य संगीत वादकांना भारतीय नोटेशन्सचे (स्वरलिपी) भाषांतर करण्याच्या महत्त्वपूर्ण संशोधनासह संगीत तंत्रज्ञानात पदवी पूर्ण केली आणि हे सर्व तिने आत्मविश्वासाने व समतोल साधत केले आहे”.
यापुढे महेश काळे यांनी असं म्हटलं आहे की, “डॉल्बी ॲटमॉस सिनेमा साउंड सिस्टमच्या निर्मितीसाठी तांत्रिक ऑस्कर २०२४मध्ये डॉल्बी मधील एक अभियांत्रिकी संघाला अकादमी पुरस्कार मिळाला. ज्या संघाचा पूर्वा एक भाग होती. त्यामुळे पूर्वाच्या या सर्व यशाबद्दल तिचे कौतुक करण्यासाठी माझ्याबरोबर सामील व्हा”.
दरम्यान, महेश काळे यांनी शेअर केलेल्या पत्नीच्या फोटोवर अनेकांनी कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, शरयू दाते या संगीत क्षेत्रातील कलाकारांसह मनोरंजन क्षेत्रातील सुकन्या मोने, पूर्वा गोखले, सानिया चौधरी यांनीही महेश काळे यांच्या पत्नीचे कौतुक केले आहे.