“कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या” अशा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेला अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. महाराष्ट्र शासनाअंतर्गत जातगणना करण्यास आलेल्या बीएमसी कर्मचाऱ्याबद्दल केलेल्या पोस्टमुळे अभिनेता पुष्कर जोग वादाच्या भोवऱ्यात अडकला. बीएमसी कर्मचाऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत पुष्कर जोगविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सदर प्रकरणाबाबत पुष्करने माफी मागितली असल्याचं समोर आलं. (Megha Ghadge On Pushkar Jog)
यावर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी तसेच नेते मंडळींनी रोष व्यक्त केलेला पाहायला मिळाला. किरण माने, अभिजीत केळकर, शरद पोंक्षे या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे पुष्करच्या वक्तव्याचा निषेध केला. यानंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने पुष्करला खडेबोल लगावले पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री मेघा घाडगेनेही त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘तुझ्या विचारांमध्येच घाण’ असल्याचं म्हणत तिने पुष्करला तिखट शब्दात सुनावले आहे.
मेघाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत असे लिहिले की, “#BMC #महिलासन्मान. जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार? बाई माणुस नसत्या तर नक्कीच दोन लाथा मारल्या असत्या? तुला दोन लाथा आणि कानाखाली मारावी अशी इच्छा झाली, पण तुझी भाषा व विचारसरणी पाहता वाईट वाटलं. कारण जात बघुन मैत्री करणारा तू. विचारांमध्येच घाण. काय करणार?” असं म्हटलं आहे.
यापुढे तिने म्हटलं आहे की, “अरे मित्रा त्यासाठी शासनाच्या सर्वेचा अभ्यास करावा. आजूबाजूला थोडी चौकशी करावी. माहितीचा फॉर्म हवा असल्यास माझ्याकडे आहे. तो मी नक्कीच तुला पाठवेन. तेही नको असेल तर तुझ्याच जातीचे काही माझे मित्रमैत्रिणी आहेत. जे तुझ्या विचारसरणीचे नाहीत, त्यांना तरी नक्की विचार. चित्रपटासाठीचा जर का हा केविलवाणा प्रयत्न असेल तर. वा घाण. वा घाण. वा घाण” असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.