Radio City Mumbai Icon Award 2025 : मराठी चित्रपटसृष्टी, मालिकाविश्व, वेबविश्वातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या ‘रेडिओ सिटी मुंबई आयकॉन अवॉर्ड २०२५’ हा सोहळा अगदी दिमाखात पार पडला. बुधवार (२७ मार्च) विलेपार्ले पूर्व येथील सहारा स्टार येथे सायंकाळी हा सोहळा थाटामाटात पार पडला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज, आणि तंत्रज्ञ मंडळींच्या साक्षीने कलाकारांच्या कर्तृत्वाचा सन्मान या मंचावर झाला. यावेळी मराठी वेबविश्वातील एका लोकप्रिय वेबसीरिजला मिळालेल्या पुरस्काराने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. ‘मीडिया वन सोल्युशन्स’ आणि ‘इट्स मज्जा’ प्रस्तुत ‘आठवी-अ’ या वेबसीरिजने यंदाच्या ‘रेडिओ सिटी मुंबई आयकॉन अवॉर्ड २०२५’ मध्ये हवा केली असल्याचं पाहायला मिळालं.
डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या अभिजीत व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे सांगण्यात आली आहे. आपण ‘आठवी अ’ मध्ये का नाही? आमच्यात काय कमी आहे? सगळ्यांना समान वागणूक का नाही? आपल्यात होणारा बदल नेमका काय आहे? प्रेम म्हणजे काय? मैत्री म्हणजे काय? असे बरेच प्रश्न बालवयात पडत असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सीरिजमधून देण्यात आली आहे. ‘आठवी अ’ या सीरिजची कथा, संवाद व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे. तर पटकथा नितीन वाडेवाले व नितीन पवार यांनी लिहिली आहे.
आठवी-अ सीरिजच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. लाखों व्ह्यूज्सचा टप्पा या सीरिजने पार केला आहे. त्यामुळे ‘आठवी-अ’ला मिळत असलेल्या या भरघोस यशाची ‘रेडिओ सिटी’नेही दखल घेत कौतुक केले. काल या सीरिजचं ‘रेडिओ सिटी मुंबई आयकॉन अवॉर्ड २०२५’च्या मंचावर भरभरुन कौतुक झाले आणि ‘प्रादेशिक वेबसीरिज – आठवी अ (इट्स मज्जा)’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘आठवी-अ’च्या संपूर्ण टीमचे हे यश आहे.
‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल ‘आठवी-अ’ या सीरिजची कथा, संवाद व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे. तर पटकथा नितीन वाडेवाले व नितीन पवार यांनी लिहिली आहे. सीरिजचे सह-दिग्दर्शक नितीन वाडेवाले हे आहेत. तर संगीत मंदार पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर अनंत श्रीवास्तवा व जैमिन शिगवण यांनी सीरिजची प्रोजेक्ट प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. तर क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे आणि फायनान्सचा पदभार विशाल मेनारिया यांनी सांभाळला आहे.