“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!” या शब्दांमध्ये श्री स्वामी समर्थांनी अनेक भक्तगणांना अभयदान दिलं आहे. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्रीदत्तात्रयांचे अवतार मानले जातात. असंख्य लोकं आज स्वामींची आराधना अन् उपासना करतात. स्वामींच्या अनेक भक्तांना कायम वाटतं की, आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपार्शिवाद आहे. अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी स्वामींचा ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा दिलासा कायम आधार देतो. त्यामुळे स्वत: स्वामी आपली पाठराखण करत आहेत, हा विश्वास आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. ‘अशक्यही शक्य करतील स्वामी’ अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे.
अनेकांच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ हे गुरुंची भूमिकाही निभावतात. हिंदू संस्कृतीत गुरूला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे. लोक गुरूला देवासारखे पूजनीय मानतात. गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. याच निमित्ताने महाराष्ट्रात अक्कलकोटमध्येही गुरुपौर्णिमा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी केली जाते. स्वामींचे अनेक भक्त त्यांना गुरु म्हणून पूजतात.
आणखी वाचा – Video : गावी भातलावणी, भजन अन् खेकडे पकडण्यात रमला निखिल बने, व्हिडीओद्वारे दाखवली खास झलक, साधेपणाचं कौतुक
अशातच उद्या २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. याच गुरुपौर्णिमेचे खास औचित्य साधत ‘इट्स मज्जा’ समस्त स्वामी भक्तांसाठी एक खुशखबर घेऊन आली आहे. २१ जुलैच्या गुरुपौर्णिमानिमित्त ‘इट्स मज्जा’ सर्व स्वामी भक्तांच्या भेटीला स्वामींचं एक खास भक्तीगीत घेऊन येत आहे. ‘श्री स्वामी समर्थ’ असं या गाण्याचं शीर्षक असून “ब्रम्हांड नायक अवधूत चिंतन, त्रैलोक्या आधार स्वामीच आहे” या ओळींनी गाण्याची सुरुवात होते. गाण्यामधील भक्तीभावामुळे गाण्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे गाणं श्रोत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – आता विषय हार्ड व्हनार! ‘तुला शिकवीन…’ फेम अधिपती-अक्षरा परदेशात करत आहेत एन्जॉय, व्हिडीओ चर्चेत
मनाचा ठाव घेणाऱ्या या गाण्याचे शब्दांकन श्रीकांत पेंढारकर यांनी केले आहे, तर गायन समीर दाते यांनी केलं आहे. तर या सुंदर भक्तीगीताला निषाद वैद्य यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘इट्स मज्जा ओरिजिनल’ आणि शौरिन दत्ता निर्मित ‘श्री स्वामी समर्थ’ हे भक्तीगीत आज दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब वाहिनीवर प्रदर्शित झाले आहे.